17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या काळात सिंहगड पायथ्यापाशी असलेल्या गप्पांगण कृषी पर्यटन केंद्रात “रंगकिशोरी स्वास्थ्य संवाद कार्यशाळा ” ही 7 दिवसीय निवासी आणि हिंदीभाषिय कार्यशाळा पार पडली. लैंगिकता, प्रजनन आरोग्य, मासिक पाळी,आपलं शरीर याविषयीचा मुक्त आणि सांगोपांग संवाद घडवणे आणि हे संवेदनशील विषय त्यातल्या वैज्ञानिक मांडणीसह साध्या ,सोप्या ,योग्य भाषेत लोकांसमोर मांडण्यासाठी वेगवेगळी संवादमाध्यमे तयार करणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता. अतुल पेठे आणि राजू इनामदार हे दोघे या कार्यशाळेचे मुख्य संवादक होते. त्यांनीच ही संपूर्ण कार्यशाळा डिझाईन केली होती. सोबतीला मी, अनिकेत दलाल आणि सचिन गोंधळी असे होतो. तसेच डॉ. अनघा भट, डॉ.मनीषा गुप्ते, बिंदुमाधव खिरे हे अतिथी संवादक या कार्यशाळेला लाभले होते. अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील PANI (पीपल्स ऍक्शन फॉर नॅशनल इंटिग्रिटी) या संस्थेने ही कार्यशाळा आयोजित केली होती. अयोध्येवरून पानी संस्थेच्या 24 कार्यकर्त्या मुली आणि 9 कार्यकर्ते या कार्यशाळेसाठी आले होते.सोबत सीमा दीदी, सतीश,असे अनुभवी कार्यकर्तेही होते.यातल्या कित्येक मुली -मुलं पहिल्यांदाच उत्तरप्रदेश सोडून वेगळ्या राज्यात येत होते. हे सर्वजण कार्यशाळेत मिळालेली माहिती आणि विषय वेगवेगळ्या संवादमाध्यमांद्वारे उत्तरप्रदेशातील ग्रामीण आणि शहरी भागातील किशोरवयीन मूला-मुलींपर्यंत पोहचवणार आहेत.
रंगकिशोरी स्वास्थ्यसंवाद कार्यशाळा
दिवस पहिला :- 17 नोव्हेंबर 2019.
दुपारी 3 वाजता 33 कार्यकर्त्यांचा जथ्था त्यांचं गाव ते अयोध्या,अयोध्या ते लखनौ,लखनौ ते दिल्ली,दिल्ली ते पुणे असा दोन अडीच दिवसांचा प्रवास करून फायनली पुणे रेल्वे स्थानकांवर पोहचला आणि सर्वाना हुश्श झालं.सीमादीदी त्यांच्या गटाचं नेतृत्व करत होत्या.”मु मिठा हो जाये” म्हणत सर्वानी स्वागताची कॅडबरी एन्जॉय केली.पुढे पुणे स्थानक ते सिंहगड पायथा via ट्रॅफिकफेमस सिंहगड रोड हा आणखीनच थकवणारा प्रवास करून जथ्था सिंहगड पायथ्यापाशी असलेल्या ओंकार देशपांडे यांच्या गप्पांगण कृषी पर्यटन केंद्र या शांत आणि निसर्गरम्य जागी पोहचला. गप्पांगण थोडं उंचावर आहे.तिथे बससारखं मोठं वाहन वरपर्यंत जात नाही. आधीच थकलेल्या लोकांना स्वतःच सामान घेऊन थोडी पायऱ्यांची चढाई करायला लागली. परंतु पोहचल्यावर समोरच सर्वाना अतुल सरांनी बनवलेली सुस्वागतम अशी कलात्मकरित्या लिहिलेली अक्षरं दिसली. सोबत अतुल सर, राजूदादा, ओंकारदादा, पंकजदादा आणि गप्पांगणची टीम हे स्वागतासाठी सज्जच होते. यांनी तिथे केलेल्या छोटेखानी पण गोड स्वागताने सर्वाचा थकवा कुठल्या कुठे पळाला. या जागेला फार्म हाऊस किंवा रिसॉर्ट न समजता स्वतःच घर समजून रहा ही आणि इतकीच महत्वाची सूचना गप्पांगणच्या ओंकारदादा आम्हाला दिली होती. कोणाची राहण्याची सोय कुठे आहे , वॉशरुम कुठे आहेत वगैरे अशा काही मोजक्याच औपचारिक सूचनांनंतर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्वजण ही नवी अद्भुत जागा आणि निसर्ग न्याहाळत, नव्या हवेचा आणि ,समोर दिसणाऱ्या हिरव्यागार शालू पांघरलेल्या सिंहगडाचा अंदाज घेत, दूरवर ऐकू येणारा मोराचा केकारव ऐकत,मावळत्या सुर्याबरोबर आपापल्या ठिकाणी गप्पा गोष्टी करत विसावले.
उद्यापासून खऱ्या अर्थाने सुरू होणाऱ्या आमच्या कार्यशाळेची उत्सुकता सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होती.
पहिला दिवस समाप्त
क्रमश:
(कृतार्थ शेवगावकर)
रंगकिशोरी स्वास्थ्यसंवाद कार्यशाळा
दिवस दुसरा :- 18 नोव्हेंबर 2019
दुसऱ्या दिवशी उद्धाटनाच्या पहिल्याच सत्राची जवाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. उपलब्ध आजूबाजूची साधनं, वस्तू वापरून किशोरवयीन मुलाची आणि मुलीची प्रतिकृती बनवण्यास मी सांगितलं आणि काही सूचना देऊन प्रतिकृती बनवण्यासाठी वेळ दिला. बनलेल्या सर्व आकृत्यांवर संवाद घडवायचा होता. बनलेल्या चारही प्रतिकृतींवर “बहोत अच्छा बना है|” इथपासून पासून सुरू झालेला संवाद पुढे किशोरवयीन मुलांची मुलींची लैंगिकता, स्वतःच शरीर,त्याच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन असा चौफेर विस्तारत गेला.ही आकृती बनवताना आलेला अनुभव, वापरले गेलेले रंग, वस्तू , आकार आणि या सर्वांशी असलेलं लैंगिकतेचं नातं याविषयी बोललं गेलं.टीमवर्क,ऐकून घेण्याची क्षमता, निर्णयस्वातंत्र्य, वस्तूंकडे पाहण्याचा दृष्टीकोन,एकमेकांविषयीचा आदर,पुढाकार घेण्याची तयारी, याविषयी बोललं गेलं. या आकृतींविषयी बोलताना “लैंगिकता ही पोटाच्या खाली आणि मांड्यांच्या वर एवढ्याच भागात नसून ती डोक्याच्या केसांपासून सुरू होऊन पायाच्या नखांपर्यंत असते” या संवादादरम्यानच्या राजुदादाच्या वाक्याने सर्वांचं लक्ष वेधलं. खरंच त्या प्रतिकृती तसं बोलत होत्या.संवादाचं एक माध्यम नकळतच तयार झालं होतं. संवादात बोलले गेलेले महत्वाचे मुद्दे ताबडतोब अतुल सर फळ्यावर लिहून काढत होते तसेच महत्वाचे मुद्देही मांडत होते. सत्र संपल्यावर या मुद्द्यांवर त्यांनी एकत्रित संवाद केला. हे मुद्दे आपणच बोललोय यावर सहभागी मुला मुलींचा विश्वास बसत नव्हता.आपणही इतकं छान आणि महत्वाचं बोलू शकतो, संवाद करू शकतो याची सर्वाना जाणीव झाली. या आकृत्या आमचं जेवण बनवणाऱ्या ताईंना आम्ही भेट दिल्या आणि त्यांनीच आमच्या या कार्यशाळेचे उदघाटन झाले हे जाहीर केले.
त्यानंतर अतिशय वेगळ्या पद्धतीने स्वतःची ओळख करून देण्याचे सत्र राजूदादाने घेतले. पुरुषसत्ता आणि पितृसत्ता नकळतपणे मनात कशी भिनवली जाते हे या ओळखीच्या सत्रातून कळले तसेच प्रत्येकात असलेल्या कलागुणांची चुणूक दाखवायची संधीही या सत्रात प्रत्येकाला मिळाली.
यानंतर अतुल सरांनी उजळणीचे तिसरे सत्र घेतले. लखनौ येथे 6 महिन्यापूर्वी झालेल्या कार्यशाळेल्या विषयांची उजळणी झाली.त्या कार्यशाळेत शिकलेले विषय प्रत्यक्ष काम करताना कशे उपयोगात आणले गेले आणि काम करताना त्यात काय काय अडचणी आल्या याविषयी चर्चा झाली. मागच्या कार्यशाळेचा सर्वाना खूप सकारात्मक उपयोग झाला होता.
यानंतर राजुदादाचे बॉडी मॅपिंगचे चौथे सत्र पार पडले.अतिशय सोप्या भाषेत शरीराची रचना त्याने गाण्यातून शिकवली. गाणं हे किती प्रभावी संवादमाध्यम आहे हे सर्वांना उमजले. अँपरन आणि पुस्तिकेच्या साहाय्याने मासिक पाळी आणि तिच्या स्टेजेसही अतिशय सोप्या भाषेत आणि चित्राच्या साहाय्याने आपण चर्चिल्या गेल्या.गर्भाशयाचे आणि योनीचे मॉडेल दाखवण्यात आले. हिंदीत मासिक पाळीला महावारी असे म्हणतात आणि त्यांच्या भागात या शब्दाचा उच्चार करणेही पाप समजले जाते. संवादाची सुरवात कुठून करावी इथपासून प्रश्न होते. ही माध्यमे, गाणी त्यांना उपयोगी पडणार होती. भाषेत Dignity ठेऊन गाणी,पुस्तक,चित्र यांचा उपयोग करून आपण योग्य ती वैज्ञानिक माहिती सहजतेने लोकांपर्यंत पोहचवू शकतो याचीच खात्री या बॉडीमॅपिंगच्या सत्रातून राजुदादाने सर्वाना दिली.
कार्यशाळेतील या दिवसाचे पाचवे सत्र खूपच नव्या माध्यमाची ओळख करून देणारे होते.डॉ.अनघा भट यांनी हे मातीपासून आपल्या शरीराची शिल्पाकृती बनवण्याचे सत्र घेतले.सुरवातीला आपल्या शरीराविषयी लहानपणापासून असणाऱ्या आठवणीची गटात चर्चा करण्यास सांगितले गेले.ज्या मोकळेपणाने प्रगल्भतेने आणि सहजतेने चर्चा होत होती त्यावरून पुढचे 5 दिवस चांगलीच वैचारिक घुसळण आणि चर्चा होणार ही आमची खात्री पहिल्याच दिवशी पटत चालली होती. लैंगिकतेची चर्चा करताना बऱ्याचदा आपण शरीरातील आतील अवयवांची,शरीरात वयानुसार होणाऱ्या बदलांची चर्चा करतो. किंवा प्रत्येक जेंडरवर बाहेरून लादलेल्या कपडे,दागिने,राहण्याच्या पद्धती,नियम याविषयी बोलतो. बाह्य शरीराकडे बघताना फक्त काळी-गोरी,उंच-बुटका अशा भेदभाव आणि कलंकाच्या नजरेनेच बघितलं जातं. नितळतेने आणि सहजतेने शरीराकडे पाहणं आपण विसरलो आहोत .शरीराच्या आतले अवयव आणि कपडे या दोहोंच्या मध्ये असलेलं शरीर, त्याची रचना ,त्यातले उंचवटे,फुगवटे,खोलगट भाग,टणक भाग,मऊ भाग,लत्यांचे वेगवेगळे आकार,त्यातलं वैविध्य या गोष्टींकडे आपण कधीच नीट लक्ष देऊन बघत नाही.किंबहुना जाणीवपूर्वक असं घाणेरडं(?) बघणं टाळायचच अशीच आपल्याला शिकवण असते. शिल्पकलेसाठी मात्र याच गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात.शरीराचे बाह्यांग समजून घेणं गरजेचं असतं. या गोष्टी समजून घेतल्याशिवाय चांगले शिल्प तयार होऊ शकत नाही. टेराकोटा मातीपासून शिल्प कसे घडवायचे याचे बेसिक प्रशिक्षण या चर्चेनंतर डॉ.अनघा भट यांनी दिले. माती आणि शिल्प बनवण्यासाठी लागणारी टूल्स दिली गेली. या प्रशिक्षणानंतर सर्व जणांनी मिळून एक पुरुषाचे, एक स्रीचे, एका गे जोडप्याचे आणि एका लेस्बियन जोडप्याचे अशी चार शिल्पे तयार केली. अतुल सर आणि अनिकेतनेही एक पाण्याचा हंडा वाहुन नेणाऱ्या गावातल्या स्त्रीचे आणि एका उदास बसलेल्या स्त्रीचे शिल्प अनुक्रमे घडवली.माती हे नवीनच माध्यम आज सर्वाना गवसले होते. माझं शरीर सुंदर आहे हा शोध सर्वानाच लागला होता. “मातीतून काय सांगणार लोकांना? …असा मनात विचार धरून सुरू झालेले सत्र “अरेच्चा , माती किती धमाल आणि परिणामकारक माध्यम आहे,” इथे येऊन थांबला. सर्वजण मातीत खुप खेळले.
या सत्रानंतर “प्राचीन शिल्प आणि चित्र यांच्यामधील लैंगिकता” या विषयावर डॉ.अनघा भट यांनी सत्र घेतले. भारतातीत विविध मंदिरांमधील शिवलिंग,मुर्त्या,खजुराहोच्या भिंतीवरील वेगवेगळी शिल्प, अमृता शेरगिल यांची चित्र, निलेश माने यांनी काढलेली काही छायाचित्र दाखवून त्यावर त्यांनी मांडणी आणि चर्चा गेली. आताच्या काळात घाणेरड समजून बाजूला टाकलेल्या “आपलं शरीर आणि लैंगिकता” या बाबतीत आपली भारतीय संस्कृती आणि समाज किती प्रगल्भ, मोकळा आणि सहज होता हे त्यांनी उदाहरणासकट दाखवून दिले.याच भारताने काही वर्षांपूर्वी विठ्ठलाच्या पंढरपुरात जन्मलेल्या एम.एफ.हुसेन या महान चित्रकाराला भारतातुन हाकलून लावलं.र.धो.कर्वे यांची आणि त्यांच्या कामाची, आणि आमच्या समाजस्वास्थ्य या नाटकाची आठवणही या सत्रामध्ये पावलोपावली येत होती.नग्न चित्रकारिता हा विषय कलाशिक्षणामध्ये अतिशय महत्वाचा समजला जातो. हा विषयही सर्व आर्ट स्कुल्सच्या अभ्यासक्रमातून आता वगळला जातोय असं डॉ.अनघा भट यांनी सांगितले. तसेच काही पुस्तके ही फक्त डॉक्टरकीचे शिक्षण घेणाऱ्या लोकांनीच वाचावी,सामान्य वाचकांनी नव्हे असाही निर्बंध मागे एकदा येऊ घातला होता.या विषयातली आपल्याकडे पूर्वी असलेली सहजता आपण पूर्णपणे गमावली आहे .आपली वाटचाल कशी प्रगतीकडून अधोगतीकडे,प्रगल्भतेकडून अपरिपक्वतेकडे होतेय हेच हे सत्र ऐकतांना सर्वाना जाणवत होते.डॉ.अभिजित हे पुरातत्वशास्त्रज्ञही या सत्रात आमच्यासोबत होते. त्यांनाही त्यांचे अनुभव आम्हाला सांगितले. ही प्राचीन शिल्प, चित्र, त्यातली कलादृष्टी पाहताना भान हरपून गेलेल्या आम्हाला बाहेर पडलेला किर्र अंधार आणि रातकिड्यांचा आवाज सत्र संपल्यावरच जाणवला.
दुसरा दिवस समाप्त.
- क्रमश:
(कृतार्थ शेवगावकर)
रंगकिशोरी स्वास्थ्य संवाद कार्यशाळा
दिवस तिसरा :-
उस्ताद बिस्मिल्लाह खा साहेबांच्या सनईच्या सुरम्य सुरांनी आमच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली होती. अडीच दिवसाचा प्रवास,दगदग,बदललेली हवा आणि रेल्वेतील खाणं यामुळे काही जणांना सर्दी,दस्त, अंगदुखी असे छोटे छोटे त्रास होत होते. अजून 4 दिवस पूर्ण दिवस काम करायचे होते आणि तब्येत चांगली राहणे महत्वाचे होती.म्हणून डॉ. दीपक मांडे यांना पुण्याहून गप्पांगण वर बोलावण्यात आले. ते स्वतःच क्लिनिक अर्धा दिवस बंद ठेऊन सर्व गोळ्याऔषधांसहित सकाळीच गप्पांगण वर दाखल झाले. ग्रामीण भागात संवादक म्हणून काम केलेल्या रोहिणीताईसुद्धा त्यांच्याबरोबर आल्या. त्या दिवसभर आमच्या सोबत होत्या.प्रत्यक्षात मात्र डॉक्टरच्या गोळ्यांपेक्षा त्यांच्या मधुर हास्याने आणि आस्थेने केलेल्या चौकशीनेच आमच्या भैया आणि दिदिंचे अर्धे आजार पळाले. डॉ. मनीषा गुप्ते सुद्धा सकाळीच गप्पांगणवर दाखल झाल्या होत्या. गीत गा रहे है आज हम रागिनी को ढुंडते हुवे या राजूदादाच्या गाण्याने कार्यशाळेची दमदार सुरवात झाली. प्रवासात घ्यावयाची शरीराची काळजी यावर डॉक्टर दीपक मांडेनी छोटे सत्र घेतले. पुन्हा काही त्रास झाला तर मी आलोच या आश्वासनासहित डॉक्टरांनी आमचा निरोप घेतला.
त्यानंतर आजच्या अतिशय महत्वाच्या अशा डॉक्टर मनीषा गुप्ते यांच्या सत्राकडे आम्ही वळणार होतो.लैंगिकता या विषयावर त्या मांडणी करणार होत्या. डॉ. मनीषा गुप्ते अनेक वर्षांपासून त्यांच्या मासुम (महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ) संस्थेमार्फत स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करताहेत. मासुमच्याच एस एम जोशी फौंडेशन येथे झालेल्या स्त्रीवादी समाजवादी दृष्टिकोन या कार्यशाळेने मला प्रथमच स्त्रियांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला होता.परत तसाच बुद्धीला खुराक मिळणार म्हणून मी उत्सुक होतो.अतिशय मुद्देसूदपणे आपल्याकडची पितृसत्ता,पुरुषसत्ताक पद्धती, आणि लैंगिकता या विषयावर मनीषाताईंनी मांडणी केली.त्यांना गावपातळीवर काम करताना आलेले अनुभव अंगावर शहारा आणणारे होते. आपली संपूर्ण समाजव्यवस्था कशी पुरुषबीजाच्या राजकारणावर आधारित आहे आणि त्यात स्त्रियांचं कशा पद्धतीने शोषण केलं जातं हे त्यांनी अतिशय मुद्देसूदपणे समजावून सांगितलं. स्त्रियांच्या शरिरावर आणि अस्तित्वावर हक्क गाजवणारी पुरुषप्रधान प्रवृत्ती आणि पितृसत्ता याचे विचारसन्मुख करणारे विवेचन त्यांनी मांडले.या कार्यशाळेनंतर काहीच दिवसात हैदराबादची मनाला सुन्न करणारी बलात्काराची घटना घडली. स्त्रियांनी रात्रीचे घराबाहेर पडू नये,पडले तर पुरुषासोबतच पडावे, त्यांनी कराटे, कुंफु शिकावे, पूर्ण कपडे घालावे, शरीर झाकावे किंवा बलात्कारी पुरुषांना भर रस्त्यात फाशी द्यावी,त्यांचे लिंग छाटावे अशा अनेक हिंसक प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर फिरत होत्या. हे उपाय नाहीतच आणि असतील तरी तात्पुरते आहेत. भीती वाटून एखादी गोष्ट न करणे आणि चुकीची वाटून न करणे यात फरक आहे. स्वतःत बदल स्त्रियांनी करावा आणि नाही केला तर पुरुष बलात्कार करतीलच अशीच साधारण धमकी या सुचनांमध्ये आहे. “आम्ही पुरुषांनी सुधरल पाहिजे ” असे कोणीही म्हणत नाही. तरी भारतात विवाहांतर्गत होणाऱ्या बलात्काराना “बलात्कार” संबोधले जात नाही. तो “हक्क” समजला जातो. कंसेंट घेण्याची गरज आणि महत्व कोणाला वाटत नाही. हे आणि अशे अनेक महत्वाचे मुद्दे या सत्रात संवादले गेले. मुलांना लहानपणापासून लैंगिकतेचे,नात्यांचे , शरीराचे शिक्षण देणे हाच यावरील उपाय आहे. परंतु त्याविषयी आपला आत्ताचा समाज खूपच उदास आहे.मनीषाताईंची या सत्रात केलेली मांडणी अजिबात नुसती पुस्तकी नव्हती.त्यांचा अनुभव त्यांच्या शब्दाशब्दातून बरसत होता.स्त्रीवादाचे चालतेबोलते बायबल ऐकण्याचा अनुभवच आम्हाला या सत्रातून आला.
यानंतर छोट्या चहाच्या विश्रांतीनंतर राजुदादाने बंदरमामा हे धमाल गीत घेतले . मनीषा ताईंनीही “We the people” हे एकतेचा आवाज बुलंद करणारे अतिशय शांत आणि ऐकत राहावे वाटावे असे गीत गायले. त्यानंतर “लैंगिकतेच्या दृष्टिकोनातून बॉडी मॅपिंग”चे सत्र मनीषा ताईंनी घेतले. एका बाईचे चित्र चार गट करून त्यांना काढायला सांगितलं गेले.केवळ स्त्री म्हणून त्यांच्यावर लैंगिकतेच्या अर्थाने किंवा लिंगभावावर आधारित कोणती बंधने घातली जातात उदाहरणार्थ मंगळसुत्र ,केस वाढवणे वगैरे या सगळ्या गोष्टी एका रंगाने हायलाईट करायच्या होत्या. तर या बंधनातून मुक्त होण्यासाठी करण्याच्या गोष्टी वेगळ्या रंगाने रंगवायच्या होत्या. आमचे भैय्या आणि दीदी पुन्हा त्याच उत्साहाने या उपक्रमाला भिडले. चारही गटांची सादरीकरण खूप चांगले झाले .अनेक वेगवेगळे मुद्दे,स्त्रियांवर असलेली बंधनं,त्यातून मुक्त होण्याचे मार्ग असा मोठा ऐवज निर्माण झाला.त्यातील काही चुका, चांगले मुद्दे संवादले गेले. प्रत्येक गटाने काढलेल्या चित्रावर घमासान चर्चा झाली. त्यानंतर स्त्रियांचे हक्क आणि लैंगिक हक्कांवर मानिषताईनी मांडणी केली. तिसऱ्या दिवसाच्या शेवटाकडे आम्ही आता वळत होतो. समाजातल्या खोलवर रुजलेल्या पितृसत्तेची दाहक जाणीव करून देणारा आणि वैचारिक घुसळणीचा हा दिवस मनीषा ताईंनी आमच्यासाठी रंगवला होता. हे रंग डोळ्यांना थंडावा देणारे नक्कीच नव्हते. तर हे रंग डोळ्यात अंजन घालणारे आणि नितळ दृष्टी देणारे होते.ही स्थिती आणि व्यवस्था मुळापासून बदलली पाहिजे. प्रत्येक स्त्रीला तसेच जन्म घेतलेल्या सर्वाना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळायला हवा. तो त्यांचा हक्क आहे. पितृसत्ता आणि पुरुषप्रधानता नाकारून, स्त्री पुरुष समानतेचा मानवतावादी विचार स्वतःच्या मनात आणि मग जनमानसात रुजवण्याचा दृढ निश्चय मनात प्रत्येक जण करत होता.
रीमा काटगी दिग्दर्शित हनिमून ट्रॅव्हल प्रायव्हेट लिमिटेड हा सिनेमा पाहून आजच्या दिवसाची सांगता झाली.
रंगकिशोरी स्वास्थ्यासंवाद कार्यशाळा
दिवस चौथा
आजचा चौथा दिवस.कार्यशाळा अगदी रंगात आलेली होती. उस्ताद बिस्मिल्ला खा साहेबांच्या सनई आणि गप्पांगणचा चविष्ट नाश्ता अशी आमची रोजची सकाळ होत होती. सेशनच्या वेळेस अभ्यास आणि इतरवेळी फक्त मजा असं या कार्यशाळेचं स्वरूप नव्हतंच.सेशनमध्ये सहभागी लोक बोलत तर होतीच परंतु अगदी सकाळी उठल्यापासून , नाश्ता,जेवण करताना,ब्रेक मध्ये वेळ मिळेल तसे स्त्रीपुरुष समानता,लैंगिकता,प्रजनन आरोग्य, स्वतःच शरीर ,नाटक, गाणी हेच गप्पांचे विषय होते. एकाने वर्गात शिकवायचे आणि बाकीच्यांनी ऐकायचे अशी एकतर्फी व्यवस्था इथे नव्हती.प्रत्येकाच्या बोलण्याला इथे अवकाश उपलब्ध होता आणि त्यातून संवाद घडत होता.शिक्षण “दिलं” जातं आणि संवाद “घडतो”. लैंगिकता शिक्षण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.परंतु त्यात सहजता आणण्यासाठी शिक्षणासोबत संवाद होण्याची गरज आहे.थोडं अवकाश प्राप्त झालं तर प्रत्येक माणूस प्रगल्भ विचार करू शकतो याची प्रचिती आम्हाला परत परत येत होती. काल पाहिलेल्या हनिमून ट्रॅव्हल या फिल्मवर सकाळपासूनच चर्चा सुरू झाली होती.
आजचा संपूर्ण दिवस बिंदुमाधव खरे हे
“LGBTQI(लेस्बियन,गे,बायसेक्शुयल,ट्रान्सजेंडर,क्यूयर, इंटरसेक्स) या लैंगिक ओळखी” या
विषयावर मांडणी करणार होते.”लैंगिकता” या शब्दाची व्याख्या काय ? या प्रश्नाने सत्राच्या सुरवातीलाच त्यांनी सर्वाना विचार करायला भाग पाडले. अतिशय संयत पद्धतीने अनुक्रमे L G B T I Q या एका एका ओळखीची सविस्तर मांडणी बिंदूमाधव खिरे यांनी केली.स्त्री पुरुष समानता ही संकल्पना आपल्या समाजात अजून पूर्णपणे रुजली नसली तरी निदान हा शब्द सर्वांच्या परिचयाचा असतो. LGBTIQ या घटकाबद्दल तर “रेल्वेत, रस्त्यात भीक मागणारे भिकारी हिजडे(?)” यापेक्षा अधिक काहीही माहिती नसते.भेदभाव आणि कलंकाची भावना तर यांच्या पाचवीला पुजलेली.स्वतःला पुरोगामी म्हणवणारे ,भेदभाव आणि कलंकाच्या विरोधात आवाज उठवणारे उदारमतवादी म्हणवणारे लोकही LGBTIQ घटकाचा मुद्दा आला की कानाडोळा करतात. आता आतापर्यंत तर कायदाही या लोकांच्या विरोधात होता.समलिंगी संबंध ठेवणे हा कलम 377 अन्वये अजामीनपात्र गुन्हा होता.जी गोष्ट निसर्गाने दिलीय त्या गोष्टीबद्दल कायद्याच्या आधार घेऊन त्यांना तुरुंगात ढकललं जात होते. हे कलम रद्द होण्यासाठी मोठी लढाई या आपल्या मित्रांना करायला लागली. या विषयाची व्याप्ती किती मोठी आहे याची जाणीव या सत्रातून सर्वाना झाली. लेस्बियन,गे,इंटरसेक्स, ट्रान्सजेंडर,बायसेक्शुयल,क्यूयर या शब्दांचा आणि लैंगिक ओळखीचा अर्थ त्यांनी सर्वाना समजावून सांगितला.आपल्याकडे बाळाचे लैंगिक अवयव पाहून बाळ मुलगा की मुलगी ठरवलं जातं आणि तीच ओळख खरी मानून पुढे आयुष्यभर लादली जाते.प्रत्यक्षात लैंगिक ओळख ही लैंगिक अवयवात नसून ती मेंदूत असते.लैंगिकता ही केवळ पोटाखाली आणि मांड्यांच्या वर नसून ती डोक्याच्या केसापासून पायाच्या नखांपर्यंत असते हीच गोष्ट इथे पुन्हा अधोरेखित होत होती. 90% केसेस मध्ये लैंगिक अवयव आणि लैंगिक ओळख ही सारखीच असते.परंतु उरलेल्या 10% केसेस मध्ये ती वेगवेगळी असते. पुरुषाचे लैंगिक अवयव घेऊन जन्मलेल बाळ मेंदूतून स्त्री असू शकते किंवा स्त्रीचे लैंगिक अवयव घेऊन जन्मलेल बाळ मेंदूतून पुरुष असू शकते.कधीकधी अर्धे स्त्रीचे आणि अर्धे पुरुषाचे लैंगिक अवयव घेऊन जन्मलेल इंटरसेक्स बाळही जन्म घेते.स्त्री स्त्रीकडे आणि पुरुष पुरुषाकडे आकर्षित होन हे भिन्नलिंगी व्यक्तींनी एकमेकांकडे आकर्षित होण्याइतकंच नैसर्गीक आहे.त्यात गैर काहीच नाही.असे अनेक मुद्दे या सत्रात चर्चिले गेले.स्वतःची खरी लैंगिक ओळख लपवत समाजात वेगळीच लैंगिक ओळख घेऊन वावरणं हे किती घुसमटीचे आणि क्लेशदायी असते याची दु:खदायी जाणीव या सत्रातून झाली.
शांती सौन्दर्यराजन. कथाकुरीची या तामिळनाडूतील खेड्यात अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेली मुलगी.स्त्रियांच्या धावण्याच्या शर्यतीत भारतासाठी तब्बल 12 आंतरराष्ट्रीय पदकं जिंकून देशाचं नाव जगात रोशन केलेली खेळाडू.2006 साली दोहा येथे झालेल्या एशियन गेम्स मध्ये शांतीने रोप्यपदक जिंकले.परंतु त्यानंतर झालेल्या जेंडर टेस्ट मध्ये ती पुरुष(?) असल्याचं लक्षात आलं आणि तिला स्पर्धेतून बाद करण्यात आलं. पुरुष असून स्त्रियाच्या स्पर्धेत खेळून देशाला आणि जगाला फसवल्याचे आरोप तिच्यावर केले गेले. मुळात शांती मुलीचे लैंगिक अवयव घेऊन जन्मली.मुलगी म्हणून वाढली. मुलगी म्हणूनच ती तिचे वैयक्तिक आयुष्य जगत होती.तसेच मुलगी म्हणून तिने स्पर्धेत भाग घेतला. परंतु पुरुषाच्या शरीरात आढळणारे काही सिड्रोम तिच्या शरीरात आढळले आणि तिला पुरुष ठरवलं गेलं.जगाच्या नजरेत ती चोर ठरली.तिने जिंकलेल मेडल तिला नाकारण्यात आलं.शांतिचं स्वप्न भंगल.त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.ज्या देशासाठी ती खेळली त्याच देशाने लैंगिक ओळखीच्या प्रश्नामुळे तिला झिडकारले आणि तिच्यावर ही वेळ आणली.सुदैवाने ती वाचली.परंतु अजूनही तिच्या खेळण्यावर बंदी आहे. लैंगिक ओळखिचा प्रश्न किती व्यामिश्र आणि गुंतागुंतीचा आहे हे या उदाहरणावरून लक्षात आलं.हा प्रश्न नाटकातून मांडायचं असं ठरलं आणि दोन गट करून याच शांतीच्या लैंगिक ओळखीच्या प्रश्नावर आधारित नाटूकल्यांचे सादरीकरण झाले.
लैंगिक ओळख हा अतिशय महत्वाचा विषय आपण सर्वांनीच किती बाजूला फेकून दिलेला आहे याची जाणीव या सत्राने सर्वाना दिली.
त्यानंतर अतुल पेठे यांनी संवादमाध्यमे आणि त्याचा वापर यावर सत्र घेतले.शरीर,वस्तूंपासून आकृती,माती,शिल्प,स्लाईड शो,चित्र,पुस्तकं,अँपरन,सिनेमा,चित्रगोष्टी,नाटक,गाणं आणि अशा अनेक कळत नकळत पणे वापरलेल्या माध्यमांची उजळली केली गेली. ही संवादाची माध्यमे वापरून आपण कसा हवा असलेला मुद्दा लोकांपर्यंत पोहचवु शकतो ,याबद्दल या सत्रात बोलण्यात आले.
आजचा दिवसही वैचारिक धुमश्चक्रीचा आणि खूप शिकवणारा होता.
रंगकिशोरी स्वास्थ्य संवाद कार्यशाळा
दिवस पाचवा आणि सहावा :-
रोजच्या सारखीच प्रसन्न सनईने दिवसाची सुरुवात झाली.गप्पांगण आता आमचे घरच झाले होते. इथलं जेवण आणि नाश्ता न विसरता येण्यासारखे आहेत. गप्पांगणला भाज्या, तांदूळ आणि इतर धान्य इथल्या शेतात पिकणाऱ्याच वापरल्या जातात.उद्या सकाळी आम्हाला आमचं हे घर सोडायच होतं. त्याआधी आज नाटकाचे सत्र होते.मी आणि अतुल पेठे यांनी हे सत्र घेतले. काल बिंदुमाधव खिरे यांच्या सत्रात आम्ही शांती सौन्दर्यराजन आणि तिच्या संघर्षावर नाटक केले होते परंतू ते इतके परिणामकारक झाले नव्हते. मुद्दा सर्वाना माहीत होता परंतु नाटक माध्यमाची फार माहिती नसल्यामुळे फक्त माहिती देणारे भाषण असल्यासारखे सादरीकरण झाले होते. नाटक रंजक होण्यासाठी काय करायला लागते,बोलायचे कसे, उभे कसे राहायचे, सुरवात,मध्य आणि शेवट कसा हवा या मूलभूत गोष्टींबद्दल बोलले गेले.आपला मुद्दा व्यवस्थित पोहचवायचा असेल तर मुद्द्यांच्या अभ्यासासोबत माध्यमांचीही तितकीच मजबूत माहिती हवी. आपले नाटक हे “POLITICAllY CORRECT AND ASTHETICALLY PERFECT ” हवे. त्यासाठी बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्द हा तावून सुलाखून घेतलेला हवा.अशी बरीच चर्चा झाली. त्यानंतर नाटकांचे सादरीकरण झाले. काल सादर केलेल्या नाटकांपेक्षा आजच्या नाटकात खूपच सुधारणा होती.
जेव्हा आपण वेगळया प्रदेशात जातो तेव्हा तिथल्या आजूबाजूच्या प्रसिद्ध स्थळांना भेट दिली पाहीजे.त्यातूनही नवी दृष्टी मिळते. तुम्ही किती छान आयुष्य जगला आहात हे तुम्ही भेट दिलेल्या वेगवेगळ्या गावं, शहर आणि स्थळांवरून ठरतं अशा अर्थाची एक म्हणही कोणत्यातरी भाषेत आहे. तदअनुसरून पुण्याजवळच्या सिंहगड, खडकवासला धरण,महात्मा फुले वाडा,राजा दिनकर केळकर म्युझियम,
,शनिवारवाडा , तुळशीबाग इथे भेट देण्यासाठी आम्ही आजचा अर्धा आणि उद्याचा दिवस राखून ठेवला होता. एक जेवण करून सर्वानी सिंहगडाचा भेट दिली. सिंहगडाचा इतिहास सांगणारे माऊली आमच्या सोबत होते.त्यांनी सर्वाना गडाची माहिती दिली. तानाजी मालुसरेच्या समाधीला वंदन करून आणि देवटाक्यातील स्वच्छ पाणी पिऊन सर्व खाली उतरलो. कार्यशाळा संपली होती.परंतु आलेल्या कोणालाच अयोध्येला परत जाण्याची इच्छा होत नव्हती इतकी सर्वजण या गप्पांगण मध्ये रमली होती. शेवटी समारोपाचे अनौपचारिक सत्र झाले.या पाच दिवसात नवीन ज्ञान मिळाले,समज वाढली,भ्रम दूर झाले,मनातली लाज गेली, सकारात्मक दृष्टिकोन मिळाला,विचार करण्याची क्षमता वाढली,नवी माध्यमे मिळाली, बोलायला खुलं अवकाश मिळालं,तर्कवितर्क करण्याची आणि प्रश्नोत्तरांची संधी मिळाली,चुप्पी तुटली, गाण्याची ताकद कळली, गैरसमज दूर झाले,वेगवेगळ्या क्षेत्रांशी आपला विषय जोडून पाहता आला,अजिबात कंटाळा नाही आला,ऊर्जा मिळाली, कौशल्य वाढली,अनेक मानसिक बंधनातून मुक्त होता आलं,अभिनय शिकता आला, अंतर्मुख होऊन कार्यशाळेचा विषय स्वतःच्या जीवनाला जोडून पाहता आला,सामाजिक सांस्कृतिक, राजकीय समज वाढली, स्वतःच्या छान आवाजाचा शोध लागला,विश्वास वाढला,सौन्दर्यतेची मनातील संकल्पना बदलली इतके आणि असे अनेक मुद्दे आमच्या भैय्या आणि दिदीने कार्यशाळेचा अनुभव शेयर करताना मांडले. पाच दिवसांपूर्वी एकमेकांना न ओळखणाऱ्या आमच्यात इतक्या कमी दिवसात छान मैत्री झाली होती. सर्वांसाठीच न विसरता येणारे हे 6 दिवस होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून महात्मा फुले वाडा, केळकर म्युझियम,शनिवारवाडा इथे भेट दिली. महात्मा फुले वाडा आणि शनिवारवाडा यांचा इतिहास,या जागांचे ऐतिहासिक महत्त्व सर्वानी समजून घेतले. त्यानंतर तुळशीबाहेतून सर्व भैय्या आणि दीदींनी मनसोक्त खरेदी केल्यावर पुणे लखनौ रेल्वेत बसवून देऊन आम्ही सर्वांचा निरोप घेतला. अशाप्रकारे ही रंगकिशोरी स्वास्थ्य संवाद कार्यशाळा सुफलसंपन्न झाली.
हे 7 दिवस आमच्या सर्वांसाठीच वेगळे आणि महत्वाचे होते.अतुल पेठे आणि राजू इनामदार यांनी अतिशय विचार करून ही कार्यशाळा आखली होती. त्यासाठी या विषयातले तज्ज्ञ वक्ते निवडले होते.हे सहा दिवस संपूर्ण वातावरण हे अभ्यासासाठी पोषक होते.ते या दोघांनी नियोजनपूर्वक तयार केले होते. एखाद्या विषयाला वाहून घेऊन काही दिवस एकत्र गटात येऊन अभ्यास करणे ही गोष्ट आज घडताना दिसत नाही.भाषणे,कार्यक्रम होतात आणि महत्वाचेही असतात.परंतु मोकळ्या अंगणात येऊन वेगवेगळ्या विषयांवर खुल्या चर्चा खूपच कमी होतात. त्यासाठी लागणारा वेळ देण्याची लोकांची तयारीही अनेक विविध कारणांमुळे कमी झाली आहे. अभ्यासवर्ग ही संकल्पना तर जवळजवळ लोप पावली आहे. असे असताना लैंगिकता या विषयाला वाहिलेली ही सहा दिवसांची निवासी कार्यशाळा मला खूपच महत्वाची वाटते. या सहा दिवसात लैंगिकतेला 360 डिग्रीतून पाहता आले.त्याचे वेगवेगळे पैलू अभ्यासता आले. दिवसेंदिवस वाढलेली सामाजिक , घरगुती हिंसा,बलात्कारी मानसिकता ,पितृसत्ता आणि पुरुषसत्ता याना समूळ नष्ट करायचे असेल, तर अशा अभ्यासवर्गाला पर्याय नाही. हे या दिवसात परत परत जाणवत होते.
