वाढदिवसाचं पत्र

Share with:


स्थळ : मध्यवर्ती कारागृह,नैनीताल

ऑक्टोबर २६ , १९३०

तुझ्या वाढदिवशी तुला खूप सार्‍या भेटवस्तू आणि शुभेच्छा स्वीकारायची सवय आहे . शुभेच्छा तर तुला आजही खूप सार्‍या मिळतील ,परंतु या नैनीतालच्या कारागृहातून मी तुला भेटवस्तू काय पाठवू शकतो?माझी भेट ही एखादी वस्तु असू शकत नाही.मी फक्त एखाद्या परीकथेतल्या सारखी माझ्या जवळची हवा तुला पाठवू शकतो,परीसोबत माझं मन पाठवू शकतो किंवा माझा आत्मा पाठवू शकतो.या गोष्टींना इथल्या कारागृहातल्या उंच उंच भिंतीसुध्दा रोखू शकत नाहीत.

तुला माहिती आहे न पिलु ,मला प्रवचन द्यायला आणि फुकटचे सल्ले द्यायला आवडत नाहीत .मला जेव्हा असं प्रवचन द्यायचा,फुकटचा सल्ला द्यायचा मोह होतो तेव्हा मी पूर्वी वाचलेली “ एका ज्ञानी माणसा” ची कथा आठवतो .कदाचित एक दिवस तू सुद्धा ती कथा असलेलं पुस्तक तुझं तू वाचू शकशील.१३०० वर्षांपूर्वी एक हुशार प्रवासी ज्ञान आणि प्रज्ञेच्या शोधत चीनहुन भारतात आला. त्याचं नाव होतं हिऐन त्संग.उत्तरेतील अनेक पर्वत-वाळवंट पार करून,अनेक धोक्यांचा,संकटांचा शूरपणे सामना करून,त्यांच्यावर मात करून तो आला .त्याची ज्ञान आणि प्रज्ञा मिळवण्याची अभिलाषा आणि तहान खूप थोर आणि खरी होती .पुढे अनेक वर्ष त्याचं वास्तव्य भारतातच होतं . तो स्वतः शिकत राहिला आणि इतरांनाही शिकवत राहिला.विशेषतः तेव्हाच्या पाटलीपुत्र (आताचं पटना ) समजल्या जाणार्‍या शहारच्या जवळ असणार्‍या श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या नालंदा विद्यापीठात तो अनेक वर्ष अध्यापनाचं कार्य करत होता.त्याचा अभ्यासाचा आणि बुद्धिमत्तेचा गौरव म्हणून त्याला “MASTER OF THE LAW “- the Law of Buddha ही पदवी प्रदान करण्यात आली.आणि तो संपूर्ण भारतभर फिरला.त्या काळी या महान देशात राहणार्‍या माणसांचा त्याने अभ्यास केला.त्याने केलेल्या या आपल्या देशातल्या भ्रमंतीवर त्याने एक प्रवासवर्णन लिहिले आणि त्याच प्रवास वर्णनातील “एका ज्ञानी माणसा”ची गोष्ट मला प्रवचन द्यायचा मोह झाला की आठवते.ही एका दक्षिण भारतीय माणसाची कथा आहे .तो फिरत फिरत बिहारमध्ये असलेल्या भागलपुर जवळच्या कर्णसुवर्ण नावच्या गावात आला.त्या गोष्टीत असा लिहिलं होतं की त्या माणसाने अंगात चिलखत घातलं होतं आणि त्याचा डोक्यावर एक प्रकाश दाखवणारी टॉर्च होती.त्याच्या हातात एक दंड होता आणि अतिशय गर्विष्ठ पावलं टाकत या विचित्र अवतारात तो फिरत होता.कोणीतरी त्याला या त्याच्या विचित्र अवताराबद्दल विचारलं . त्यावर तो म्हणाला,“ मी मिळवलेले ज्ञान इतकं महान आणि मोठ आहे की जर मी हे चिलखत परिधान केलं नाही तर पोटात ज्ञानाचा स्फोट होऊन ते फुटेल आणि माझ्या आजूबाजूच्या अंधारात असणार्‍या अज्ञानी लोकांना मी डोक्यावरच्या टॉर्च मधून प्रकाश दाखवतोय . “

मला तर खात्री आहे की खूप ज्ञान मिळवल्याने असा स्फोट वगैरे काही होत नसतो.त्यामुळे मला अशा चिलखताची गरज नाही.आणि मला आशा आहे की माझं ज्ञान हे काही माझ्या पोटात राहत नाही. माझं ज्ञान जिथे कुठे असेल तिथे नक्कीच अजून खूप जागा रिकामी आहे याची सुद्धा मला खात्री आहे.कारण या जगातल्या कितीतरी गोष्टी मला माहीत नाही. त्याबद्दलचं ज्ञान,आकलन मला नाही . जर माझे ज्ञान इतकं छोटं असेल तर मी स्वत:ला ज्ञानी कसं म्हणूवून घेऊ शकतो?आणि लोकांना चांगले सल्ले तरी कसा देऊ शकतो? मला नेहमी वाटतं की काय चांगलं आणि काय वाईट,काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे सगळं बोलून , चर्चा करून,संवाद करून ठरवलं पाहिजे.तिथे प्रवचनाचा काही उपयोग नाही.चर्चेतून,संवादातूनच कधीतरी काही सत्याचे तुकडे हाती लागू शकतात.मला नेहमीच तुझ्याशी गप्पा मारायला,बोलायला आवडतं.आपण अनेक गोष्टींविषयी बोललेलो आहोत . पण जग खूप मोठं आहे.आणि आपल्या जगापलीकडेही एक सुंदर , विस्मयकारक आणि गूढ जग आहे . त्यामुळे जगात जे जे शिकण्यासारखं होतं ते माझं शिकून झालय,मला ज्ञानप्राप्ती झालीये असं म्हणणारा तो हिऐन त्संग च्या कथेमधला माणूस मूर्खच असला पाहिजे आणि आपण एवढे जास्त ज्ञानी नाही आहोत हे पण चांगलच आहे.जर असं कोणी खरच असेल तर शिकण्यासारखं काहीच आयुष्यात न राहिल्याने त्याला उदासी येईल.नवं शिकण्यातली,शोध लावण्यातली मजा अशा माणसाला घेताच येणार नाही .आपण कमी ज्ञानी माणसं मात्र पुरेपूर नवं शिकण्यातली मजा,साहस अनुभवू शकतो .

मला तूला प्रवचन देणं टाळलं पाहिजे. पण मग मी करू काय ? तू माझ्या समोर नसताना तुझ्याशी बोलू कसं ? एखादं पत्र किंवा लिखित संदेश संवादाची जागा कधीच घेऊ शकत नाही.कितीही म्हंटलं तरी ते एकतर्फी असतं.म्हणून आता मी तुला जे काही सांगेल ते तुला प्रवचन देतोय असं वाटलं तर कृपया तसं समजू नकोस. तू विचार करावास म्हणून मी तूला काहीतरी सूचित करू पाहतोय असं समज.आपण बोलतोय,समोरासमोर बसून गप्पा मारतोय अशी कल्पना कर.

आपण इतिहासात अनेक देशांच्या महान काळाविषयी,अनेक महान लोकांविषयी,त्यांनी केलेल्या महान कामाविषयी वाचतो.त्यांचे विचार समजून घेतो.कधीकधी आपण सुद्धा स्वप्नात स्वत :ची त्या काळात असलो असतो तर कसं त्या महान लोकांसारखं काम केलं असतं अशी कल्पना करतो.तुला आठवतं का तू जेव्हा जेनी-डी-अर्क ची कथा पहिल्यांदा वाचली होतीस तेव्हा कसलं भारी वाटलं होतं तुला.तिच्यासारखचं होण्याची महत्वाकांक्षा होती तुझी . सामान्य माणसं सहसा अशी महत्वाकांक्षा बाळगत नाहीत.ते फक्त त्यांच्या रोजीरोटीचा,मुलांचा,घरेलू चिंतांचा विचार करतात.परंतु अशी वेळ येते की सगळेच लोक एकनिष्ठेने ,श्रद्धेने एकाच चांगल्या कामासाठी झटत असतात आणि मग साधी,सामान्य पण नेतृत्व करतात, त्या काळावर आपला ठसा उमटवतात आणि इतिहास ढवळून निघतो.महान नेत्यांमध्ये काहीतरी असतं ज्यामुळे सामान्य लोकांना प्रेरणा मिळते आणि ते महान कार्य करून जातात .

तुझा जन्म १९१७ झाला . इतिहासातलं ते एक आठवणीत राहणारं वर्ष होतं.याच वर्षी एका प्रेमळ आणि गरिबांविषयी कणव असणार्‍या एका नेत्याने थोर आणि कधीही विसरता न येणारा इतिहासातला अध्याय लिहिला.तुझा जन्म ज्या महिन्यात झाला त्याच महिन्यात लेनिनने क्रांतीची घोषणा केली जिने नंतर रशिया आणि सरबियाचा चेहरामोहरा बदलला.आज भारतात एक थोर नेता,ज्याला गरीब,शोषित वंचिताविषयी प्रेम,कणव आहे,त्यांना मदत करण्याची इच्छा आहे ,त्याने आपल्या जनतेला त्यागाचे,प्रयत्नांचे महत्व पटवून दिले आहे,जेणेकरून परत त्यांना स्वातंत्र्य मिळेल. गरीब, वंचित,शोषित जनता यांच्या डोक्यावरचं ओझं कमी होईल.बापुजी तुरुंगात आहेत.पण तरीही त्यांचे संदेश अक्षरशः जादू झाल्या सारखे लाखो लोकांच्या हृदयापर्यंत पोहचत आहेत. अनेक लोकं,स्त्रिया,इतकंच काय लहान मुलं आपापल्या घरातून , झोपड्यातून बाहेर पडताहेत आणि भारताला स्वातंत्र्याची हाक देताहेत . भारतात आज आपण इतिहास बनवतोय.हा थोर इतिहास आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय.आपण त्याचा एक छोटासा भाग आहोत . खरोखर आपण दोघेही खूप भाग्यशाली आहोत .

आपण या महान स्वातंत्र्य चळवळीमध्ये काय योगदान देऊ शकतो?आपण कोणती भूमिका त्यात पार पडायला हवी?आपल्या वाट्याला या चळवळीचा कोणता भाग येईल ते आपण सांगू शकत नाही.परंतु एक नेहमी लक्षात ठेव,या चळवळीचे नुकसान होईल किंवा आपल्या लोकांना मान खाली घालावी लागेल अशी एकही कृती आपल्या हातून घडणार नाही याची दक्षता घ्यायला हवी .आपण जर भारताचे स्वात्रंत्र्यसैनिक असू तर भारताची आन,बाण आणि शान आपल्या हातात आहे आणि ती राखायची असेल तर आपला एकमेकांवर प्रगाढ विश्वास आणि श्रध्दा असणं गरजेचे आहे . बर्‍याच वेळेस आपण नक्की काय करावे या बाबतीत शंका असेल.काय बरोबर आणि काय चूक हे ठरवणं खरच खूप अवघड गोष्ट असते कधीकधी.तुला जेव्हा जेव्हा अशी शंका येईल तेव्हा एकच कर असं मी तुला सांगेन.कुठलीही गोष्ट कधीही गुपित ठेऊ नकोस.तुला कोणापासून कही लपवावं वाटलं तरी लपवून ठेऊ नकोस.लक्षात ठेव.तुला कोणतीही गोष्ट लपवण्याची जेव्हा इच्छा होईल त्याचा अर्थ असं की तुझ्या मनात भीती आहे.भीती ही खूप वाईट गोष्ट आहे . तुझ्यासाठी अयोग्य आहे.अजिबात कशाला भिऊ नकोस.स्वत:वर विश्वास ठेव.बाकी सगळं आपोआप नीट होईल.आत्मविश्वास ठेवलास तर भीती वाटणार नाही आणि तुला स्वत:ची लाज वाटेल असही काही तुझ्या हातून घडणार नाही.तुला तर माहितीच आहे , आपल्या बापूजींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या महान स्वातंत्र्य चळवळीत गुपित ठेवायला,लपवण्याला अजिबात काही थारा नाही.आपल्याकडे लपवण्यासारखं काहीच नाहीये . आपण जे बोलतो,जे करतो त्याची भीती आपल्याला वाटत नाही.आपण स्वच्छ सूर्यप्रकाशात काम करतो . आपल्या खासगी आयुष्य सुध्दा सूर्य प्रकाशासारखं स्वच्छ ठेऊयात . लपूनछपून,गुप्तपणे काहीही करायला नको. प्रत्येकाला त्याचं खासगी आयुष्य असतं हे मला मान्य आहे आणि ते असलंच पाहिजे . परंतु खासगी आयुष्य असणे आणि गुप्तता पाळणे यात फरक आहे.हा फरक जर तू ओळखलास तर नक्कीच तूझं आयुष्य,सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ , भीती नसणारं,प्रसन्नदायी,आनंददायी असेल .

मी तुला खूपच मोठं पत्र लिहिलं. अजूनही मला तुला खूप खूप सांगायचं आहे . पण हुश्श्श्स …या पत्रात ते कसकाय मावेल ?

तुझी आई.ती सुद्धा खुप शूर आहे.तुला काही अडचणी आल्या तर तिच्यापेक्षा चांगली मैत्रीण कोण असणार तुझ्यासाठी?खरंच भाग्यवान आहेस तू.

टाटा.खूप मोठी हो.खूप प्रेम आणि सदिच्छा .

-जवाहरलाल नेहरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *