मी मूळचा औरंगाबादचा.पुण्यात माझ्या घरी एकटाच सध्या असतो.पुण्यात नोकरी करतो आणि त्यासोबत नाटकात काम करतो. पुण्यात कोरोनाची साथ वाढली आणि प्रत्येकाने घरात थांबावे आणि बाहेर जाऊ नये अशी सूचना सरकारतर्फे देण्यात आली.मी अर्थातच सरकारच्या नियमांचे पालन करणार होतो.ज्या खानावळीत मी जेवण करायचो त्या खानावळवाल्या काकूंनी 2 दिवस खानावळ बंद करून पार्सल दिले पण नंतर तेही बंद केले.घरी गॅस होता परंतु कधी मी फारसा त्या वाटेला गेलो नव्हतो. परंतु आता गत्यंतर नव्हते.2-3 दिवस तरी माझी सोय मला करायला लागणार होती. म्हणून मी पोहे वगैरे बेसिक पदार्थावर 2-3 दिवस काढुया असे ठरवले. पुढे 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा झाली आणि धाबे दणाणले. जेवणाचे काय?असा प्रश्न होता. सर्वप्रथम मी काही केले असेल तर घरचा किराणा भरला.कारण 21 दिवस असेच पोहे वगैरे जुजबी पदार्थावर काढणे अवघड होते.दुकानात उपलब्ध असलेली सर्व पीठे,मसाले,कडधान्य,भाज्या मी घेऊन आलो.पहिला पदार्थ बनवला मसाला खिचडी.मग दुसऱ्या दिवशी पोळ्या.आणि माझा एक वेगळाच शोध मला लागला.स्वैम्पाक मी लहानपापासून पाहिला होता पण आता प्रत्यक्ष करतानाचा अनुभव खूप वेगळा होता.
नाटकात टायमिंगला खूप महत्व असते.कितीही चांगला विनोद असला तरी टायमिंग चुकलं तर विनोदाचे “हसे” होते.स्वैपाक मला त्याच्यासारखा वाटला.टायमिंग इथेही तेवढंच महत्वाचं.एखाद्या भरलेल्या सभागृहात प्रयोग सादर होतो.तो झाल्यावर सेट वगैरे काढलेल्या रिकाम्या रंगमंचावर जाऊन मोकळ्या खुर्च्याकडे पाहिलं की तासभरापूर्वी इथे जो जिवंत अनुभव आपण घेतला ते ‘सत्य होते की भास?’ अशी एक भावना मनात उत्पन्न होते.रिकाम्या सभागृहाचा एक भकास वास असतो.त्या वासाने भकास वाटतं.ते हरवलेले क्षण पुन्हा जिवंत करण्याची इच्छा मनात निर्माण होते. स्वैपाकघरातील भांडी वगैरे धुवून स्वच्छ मोकळ्या ओट्याकडे पाहिलं की त्याच भावनेची आठवण झाली.त्यामुळे मग मला मजा यायला लागली.
गेल्या 10 दिवसात असे माझे 20 प्रयोग करून झाले आहेत. त्यात मी साधं वरण भात,गवारीची भाजी,पोळ्या,दहिगुटी,वरणफळं,दालफ्राय,पुऱ्या,पुदिना पराठा,चना मसाला,पाणीपुरी,मूग डाळ,शेवगाच्या शेंगांचे वरण,काकडी थालीपीठ,टोमॅटो भात,झुणका,आलू पराठा,डाळ मेथी,टोमॅटो सूप,शेपू पराठा इतके पदार्थ बनवून पाहिले.घरात एकटाच असल्याने मीच कलाकार आणि मीच प्रेक्षक असे समीकरण होते. आनंदाची गोष्ट म्हणजे एकही पदार्थ फारसा फसला नाही आणि त्यामुळे एकही दिवस मला उपाशी राहावे लागले नाही. मार्गदर्शन करण्यासाठी माझी आई ,युट्युब,आणि इतर मित्र मैत्रिणी होतेच.त्यांची मदत झाली.
लहानपणापासून आई स्वैपाक करताना केलेलं टाईमपास निरीक्षण माझा आत्ताचा टाइम क्रिएटिव्हली पास करण्यासाठी कामाला आले.कोरोनाच्या काळात माझं मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी स्वैपाक मला मदत करतो आहे.सोबत फूड फोटोग्राफीचा ही नाद लागलाय.स्वसंवाद साधण्यासाठी तर उत्तम वेळ म्हणजे स्वैपाक करतानाची.तुमचा मूड जसा असेल त्याचा चविवरही परिणाम होतो बरं का ! त्यामुळे छान स्वैपाक करायचा असेल तर मूडही छान ठेवावा लागतो.
आपल्याकडे स्वैपाक फक्त मुलींनीच शिकावा आणि करावा ही संकुचित वृत्ती ओलांडून पुढे जाण्याची आपल्या सर्वानाच गरज आहे.सर्व गोष्टी सर्वाना आल्या पाहिजे असे मला वाटते.
लोकडाऊन अजून भरपूर दिवस आहेत आणि पुढे आयुष्यही पडलेलं आहे.देखते है क्या क्या पकता है मेरी रसोईमे !
Nice