रौप्यमहोत्सव. पंचवीस वर्ष. या जगात येऊन आज मला २५ वर्ष होत आहेत याचा मला अतिशय आनंद होत आहे , तसेच काहीच फारशी जवाबदारी नसणारी वर्ष संपून आता जवाबदारी वाली वर्ष समोर येउन उभी ठाकानारेत त्यामुळे मनाच्या एका कोपऱ्यात दुःख ही आहे . परंतु या जवाबदारी ला संधी म्हणून पाहिला आणि जोमाने भिडला तर त्या चढाओढीतही तितकीच मजा आहे; याविषयी माझा मनात काही संदेह नाही. .
या २५ वर्षांच्या जगण्यात काय कमवलं आणि काय गमावलं हा विचार मनात घोळत होता आणि हा विचार करताना लक्षात आला की आपल्यालाच हे पुढे कधीतरी, मागे वळून बघताना कामाला येईल; आणि नाही आला तरी काही फरक पडत नाही, पण लिहून काढूयात.
अर्थात , इथे मी स्वतःविषयी लिहित असल्यामुळे स्वतःवरच्या प्रेमाखातर फक्त चांगल्या त्या गोष्टी लिहायच्या आणि वाईट (आणि खऱ्या ) त्या लपवायच्या असा व्हायची शक्यता आहे पण त्याला गत्यंतर नाही. कारण केलेल्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा खऱ्या सांगण्याची हिम्मत अजून तरी माझात आलेली नाही .
तर मी . आज वय वर्ष २५
सरधोपटपणे या २५ वर्षांची विभागणी करायची झाली तर ती
१)बालपण (वय १ दिवस ते १२ वर्ष )
२)पौगंडावस्था (वय १३ ते १९ वर्ष )
३)तारुण्य ( वय २० वर्ष ते आजपर्यंत आणि पुढे )
अशी करता येईल.
पण या तीन गोष्टींबद्दल लिहिला तर माझ्या हाती मला जे पाहिजे ते लागेल असा वाटत नाही. कारण केवळ जुन्या आठवणी जागवणे आणि त्यात रमणे हा माझा लिहिण्याचा उद्देश अजिबात नाही .तर आजपर्यंत जे जगलो त्याचा अर्थ शोधणे आणि त्या शोधातून अजून चांगला जगण्यासाठी काही बोध होत असेल तर त्या बोधाचा पुन्हा शोध घेणे हा माझा उद्देश आहे .
म्हणून बालपणीचा काळ , त्यातल्या गमती , भांडणं , पौगंडावस्था ,त्या काळात पडलेले लैंगिकतेचे प्रश्न , पहिल्यांदा ब्लू फिल्म पाहिल्याचे किस्से , शाळेत आवडलेल्या मुली , नंतर तारुण्य , कॉलेज , शिक्षण , मित्र ,नोकरीची शोधाशोध वगैरे वगैरे वगैरे या आणि अशा अनेक गोष्टीना फाटा देऊन पुढे जातो क़ारण आपल्यापैकी प्रत्येक जण या अवस्थांमधून जातो आणि माझा या बाबतीतल्या गोष्टी तुमच्यापेक्षा काही फार वेगळ्या नसणार.
मग आता कशी काय विभागणी करावी या २५ वर्षांची ?
तर मी ती ,
१)औरंगाबाद मधील २१.५ वर्ष
२)औरंगाबाद सोडल्या नंतरची ३.५ वर्ष
अशी करेल.
१)औरंगाबाद मधील २१.५ वर्ष
कोणत्याही माणसाच्या जडणघडणी मध्ये सर्वात जास्त प्रभाव जर कशाचा पडत असेल , तर तो पडतो तुम्हाला काही कळत नसताना लहानपणी तुमच्या आजूबाजूचे लोक कसे वागतात त्याचा . बहुतेक वेळा हे लोक तुमचे आई , वडील , सख्खे भावंड असतात . या नियमाने माझ्या “आताच्या असण्यावरही” माझे आई , वडील , भाऊ यांचा प्रभाव आहे.
(फक्त अभ्यास आणि परिक्षेतले गुण या पडलेल्या प्रभावाला अपवाद आहेत . असो )
“संस्कार” नावाची गोष्ट माझावर माझ्या आई-वडिलांनी भरपूर केली आणि मला त्या संस्कारांचा गेल्या २५ वर्षात (विशेषतः औरंगाबाद सोडल्या नंतरच्या काळात ) वेळोवेळी खूप उपयोग झालाय आणि होतोय .
“संस्कार ” हा शब्द इथे मी केवळ धार्मिक संस्कार (फक्त श्लोक म्हणणे, स्तोत्र पाठांतर वगैरेआणि तत्सम ) या संकुचित अर्थाने वापरत नाहीये.
ते धार्मिक संस्कार माझावर झालेच . त्यापैकी जे मला तर्काच्या पातळीवर पटतात ते मी आजही अंगीकारतो. पण वर उल्लेखलेला “संस्कार” हा शब्द मी “माझा मनावर आणि मेंदूवर नितीमुल्या निर्मितीसाठी दैनंदिन व्यवहारातून आणि निरीक्षणातून झालेले संस्कार ” या अर्थाने वापरला आहे . किवा आपण याला “दैनंदिन जगताना निरीक्षणातून होणारे नितीमुल्यात्मक संस्कार ” असही म्हणू शकतो .
असे असंख्य सकारात्मक संस्कार माझावर औरंगाबाद ला असताना घरातल्या घरात झाले. कधी नकळत , कधी निरीक्षणातून , कधी धाक दाखवून , कधी काठी दाखवून . या सगळ्या सकारात्मक संस्कारांचा माझ्या “आताच्या असण्यावर ” प्रभाव आहे .
औरंगाबाद मधला अजून एक मला महत्वाचा वाटणारा टप्पा म्हणजे “शिल्पकार ” या संस्थेशी झालेली माझी ओळख .”शिल्पकार” संस्था आणि सुर्यकांत सराफ सर गेल्या अनेक वर्षापासून औरंगाबाद मध्ये नाटकाच्या माध्यमातून मुलांवर “संस्कार” करण्याचे काम करतात . औरंगाबाद सारख्या शहरात , जिथे माझा कळत्या वयात लहान मुलांचे नाटक ही गोष्ट जवळपास लोप पावली , त्या काळात या संस्थेने आम्हाला नाटक नावाची गोष्ट मनसोक्तपणे खेळायला अंगण दिले . येथील कार्याषांमध्ये अनेक दिग्गज लोक लहान वयात भेटले ,जागतिक सिनेमा लहान वयात पाहायला मिळाला आणि तो पाहण्यासाठी माझे डोळेही तयार झाले हे डोळे तयार होण्यात ज्ञानेश झोटिंग याचा मोठा वाटा आहे . सिनेमाची भाषा ही त्याने दाखवलेल्या सिनेमांमुळे आणि त्यानंतर त्याचसोबत केलेल्या चर्चांमुळे कळायला तर लागलीच पण सिनेमा पाहणे आणि डोळ्यांसमोरून सरकवणे यातला फरक ही कळला.
“कला”” नावाच्या गोष्टीकडे डोळसपणे पाहण्याची प्राथमिक तयारी “शिल्पकार ” च्या कार्याशालांमुळे झाली आणि पुढच्या पायरीवर पाय टाकायला मी तयार झालो .
शिल्पकार ने केलेल्या या कलात्मक संस्कारांचा माझा “आताच्या असण्यावर ” प्रभाव आहे .
अजून एक गोष्ट औरंगाबादला असताना अधेमधे घडली ती म्हणजे मला वाचनाची आवड लागली आणि ती मी आजपर्यंत जोपासतो आहे . वाचन या गोष्टीने माझा स्वतःकडे आणि पर्यायाने सगळ्याच गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन अंतर्बाह्य बदललेला आहे.
वेगवेगळे साहित्य , कथा , कविता , कादंबऱ्या , लेख वाचताना त्याचा प्रचंड प्रभाव माझावर पडला . त्यांनी माझा मनाला प्रश्न पडले. वाचनामुळे भाषेची गंमत कळली . शब्दांशी दोस्ती झाली. या शब्दांच्या दोस्तीतून कविता लिहिण्याचा नाद लागला.आणि कविता लिहिण्याने माझी विचार करण्याची क्षमता तेव्हा खूप वाढवली.
(सध्या कविता लिहिणं बंद आहे. वय वाढता तसा माणसाची विचार करण्याची क्षमता संपते की काय ?? असो. )
या शब्दांशी झालेल्या दोस्तीचाही माझा “आताच्या असण्यावर ” प्रभाव आहे .
हे सगळा असूनही वय वर्ष २२ पर्यंत माझ्या जगण्याच्या काही कल्पना नव्हत्याच. असतील तर त्या अतिशय मध्यमवर्गीय होत्या. त्या कल्पना आता वय वर्ष २५ व्या वर्षी मला स्वच्छ माहित आहेत अस नाहीये पण आज त्याविषयी मनात विचार तरी घोळताहेत . २१ व्या वर्षी तेही नव्हते.
मला , तुम्हाला आणि पर्यायाने जगातल्या प्रत्येक माणसाला वेगवेगळे प्रश्न , समस्या भेडसावत असतात .
आणि एक प्रश्न , समस्या सुटली तरी खेळ काही संपत नाही .पुन्ह वेगळे प्रश्न , समस्या वेगळ्या स्वरुपात तोंडाचा आ करून उभे ठाकलेले असतातच. .
कोणत्याही बाबा ,बुवा, ज्योतिषी, नशीब , दैव यांच्या नादाला न लागता , त्या प्रश्नांना आणि समस्यांना दुप्पट वेगाने भिडण्यासाठी लागणारा आत्मविश्वास मिळवण्याची पूर्वतयारी या औरंगाबाद ला असतानाच्या वर्षांमध्ये झाली. ती तयारी पुरेशी होती असा माझा गेल्या ३.५ वर्ष या छोट्या काळातला अनुभव आहे .
येणारा काळच हे चित्र आणखी स्वच्छ करेल.
२)औरंगाबाद सोडल्यानंतरची ३.५ वर्ष .
जर तुम्हाला खरच जगण्याविषयी काही शिकायचा असेल तर लवकरात लवकर स्वतःच घर सोडणे हा उत्तम उपाय आहे याविषयी माझा मनात काडीचही दुमत नाही.
स्वतःच्या सुरक्षिततेचे वर्तुळ मी इथे तोडले . औरंगाबाद सोडले .
जगतविख्यात सिनेदिग्दर्शक सत्यजित रे यांच्या पथेर पांचाली सिनेमातला छोटासा अपू जेव्हा सिनेमाच्या शेवटी आपल्या वडिलांची छत्री घेऊन घराबाहेर पडतो तेव्हा आपल्याला अचानक तो “मोठा ” (केवळ वयाने नव्हे ) झाल्याची जाणीव होते. पथेर पांचाली मधला तो सीन सिनेमा बघताना मला खूप माझा वाटला होता .
औरंगाबाद ला असतानाचा वय वर्ष २१ मधला मी आणि औरंगाबाद सोडल्यानंतरचा ३.५ वर्षात बदललेला मी यात मला स्वतःलाच खूप जास्त फरक जाणवतो . या काळात पुन्हा मी अंतर्बाह्य बदललो आहे. या काळातला रोजचा दिवस नवीन शिकवणारा आणि डोक्यात प्रकाश पडणारा आहे .
नाटक नावाची गोष्ट करण्यासाठी धडपड करत असताना अतुल पेठे या माणसाशी गाठ पडली आणि नाटक करायचा जे माझा चिमुकला स्वप्न होता ( २१ व्या वर्षी खर तर ते माझा मोठा स्वप्न होता ) ते तर पूर्ण झालाच पण असंख्य गोष्टी शिकायला आणि अनुभवायला मिळाल्या .
डॉ. नरेंद्र दाभोलकर या हुशार, क्रियाशील , विवेकी माणसाशी गाठ पडली. त्यांचा पुस्तकांतून , व्याख्यानांमधून माझा मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आणि डोळ्यांवरची झापडं ही उडाली.
स्वतःकडे ,माणसाकडे , आणि जगाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनातही या काळात सकारात्मक बदल झाला. माझ्या शरीरातल्या मेंदू नावाच्या अवयवाला खूप व्यायाम आणि खुराक मिळाला आणि अजूनही मिळतोय .
हे जे सकारात्मक बदल मला आज जाणवताहेत ते होण्यात अनेक पुस्तकांचा, माणसांचा , केलेल्या प्रवासाचा , पाहिलेल्या आणि केलेल्या नाटकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या सहभाग आहे .
२ वर्षांपूर्वी मी “स्त्रीवादी समाजवादी दृष्टीकोन ” नावाची कार्यशाळा केली .त्य कार्यशाळेमुळे माझा “स्त्री ” कडे बघण्याचा दृष्टीकोन १८० अंशाने बदलला .
अनिस लोक रंगमंच तर्फे गेल्या २ वर्षात आम्ही महाराष्ट्रभर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या निषेधासाठी विवेकी मार्गाने प्रयोग केले . बंदुकीतल्या गोळीपेक्षा नाटकाची ताकद किती जास्त असते याचा अनुभव आला . हे प्रयोग आम्ही झोपडपट्टी ते उच्च वर्ग अशा वेगवेगळ्या वर्गातल्या लोकांसमोर केले . त्यांचाशी गप्पा मारल्या. आपला समाज ही किती जटील गोष्ट आहे आणि त्या समाजाचे प्रश्न हे किती महा भयंकर आहेत याची पुसटशी कल्पना ह्या गप्पा मारताना आणि प्रयोग करताना आली.
या वर्षात घडलेली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे केलेला प्रवास. नाटकाच्या निमित्ताने राज्यभर आणि देशभर जायला मिळाले.
गेल्या दोन वर्षात वेगवेगळ्या नाटकांचे १५० पेक्षा जास्त प्रयोग राज्यभर आणि देशभरात केले . त्यामुळे क्षितीज विस्तारले गेले .
गेल्या वर्षी “संविधान परिचय कार्याशाले” त सहभाग घेतला . फार नियमाने ती पूर्ण करू शकलो नाही .पण ज्या संविधानाविषयी काडीचीही माहिती नव्हती त्या संविधानाशी तोंडओळख झाली .
श्याम मनोहर यांच्या पुस्तकांनी माणूस (या संज्ञेत स्त्रिया पण येतात याची कृपया दखल घ्यावी.) नावाची गोष्ट अतिशय वेगळ्या नजरेतून आणि कोनातून दाखवली ज्याने डोळे आणि मन समृद्ध झाले .
हमीद दलवाई यांच्या साहित्यामुळे तीनताड डोळे उघडले . मुस्लिम समाज , मुस्लिम स्त्रिया , त्यांचे प्रश्न यांचाकडे पाहण्याचा दृष्टीकोन या साहित्याने दिला .
अतुल पेठे आणि राजू इनामदार यांचा कार्यशाळेने स्वतःकडे, स्वतःच्या शरीराकडे , लैंगिक प्रश्नांकडे डोळस नजरेने पाहायला शिकवले .
टाइमपास (प्रोतिमा बेदी ), एका शापाची जन्मकहाणी (स्त्रीच्या मासिक पालीचा सामाजिक- सांस्कृतिक इतिहास) (अरुणा देशपांडे ),कानोसा (राणी बंग),शिवाजी कोण होता ?(कॉम. गोविंद पानसरे ), दाभोलकरांची सर्व पुस्तके , शंभर मी (श्याम मनोहर ), दगडावरची पेरणी (सयद्दभाई), डॉ. लागू आणि विजय तेंडुलकरांची मुलाखत , या पुस्तकांचा प्रभाव या काळात माझावर पडला .
वरील सर्व गोष्टीनी मला प्रचंड मोठ्या प्रमाणावर वैचारिक ,राजकीय आणि सामाजिक भान दिले .
या काळात मी वैयक्तिक स्वार्थाच्या , भौतिक गोष्टींच्या पलीकडे पाहायला शिकलो .
औरंगाबाद सोडल्यानंतर वरील सर्व गोष्टींचा माझ्या “आताच्या असण्यावर” प्रभाव पडलेला आहे आणि मला तो प्रभाव सकारात्मकच वाटतो.
अर्थात, खरा शिकणे तर आता सुरु होणार आहे. घरात बसून व्यायाम करण्याचा आणि दंड मजबूत करण्याचा काळ संपून आता मैदानात उडी घेण्याचा काळ आलेला आहे आणि त्या काळाशी पंगा घ्यायला सर्व शस्त्रानिशी मी, वय वर्ष २५, आज तयार आहे.
आजवर जे जगलो , त्या
“जगण्याचा शोध घेणे आणि त्यातून काही बोध होतोय का ते पाहणे”
या उद्देशातून मी हा पसारा मांडला. पुढील जगणं अधिक सुकर करण्यासाठी काही कल्पना असतील तर जरूर कळवा. आपला स्वागत आहे .
तूर्त रजा घेतो .
चूक भूल द्यावी घ्यावी .
जगलो ,वाचलो तर पुन्हा भेटूयात . नवीन रशरशीत जगलेल्या अनुभवांसह .
१३ फेब्रुवारी २०४१ रोजी
वय वर्ष ५० साली .
सुवर्णमहोत्सवात.