1995 साली पुणे आकाशवाणी केंद्रासाठी अभिनेते निळूभाऊ फुले यांची मुलाखत नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी दोन भागात घेतली होती. भाग एक आपण वर वाचला. (वाचला नसेल तर इथे वाचू शकता) आता हा दुसरा भाग.
मुलाखत भाग २
अतुल पेठे : श्रोतेहो नमस्कार. पहिल्या भागात आपण निळू फुले या समर्थ अभिनेत्याचा आयुष्याचा प्रवास ऐकला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत त्यांनी अभिनयाची ऊंची तर गाठलीच पण माणूस म्हणूनही ते सर्वांच्याच आदरास पात्र ठरले. निळूभाऊंचा अभिनय नाटक आणि चित्रपटात सर्वस्पर्शी ठरत आलेला आहे. निळूभाऊंनी रंगवलेली अनेक पात्र ही रसिकांच्या मनावर अधिराज्य करत आलेली आहेत. एक गाव बारा भानगडी मधला बेरकी झेलेअण्णा, सामना मधला सहकारसम्राट, सिंहासन मधला दिगू, शापित मधला गरीब बाप अशा अनेक भूमिकातून ते प्रेक्षकांची मने जिंकत राहिले. नाटकातही सखाराम बायंडर आणि बेबी या नाटमधला राघव ही त्यांची पात्र अविस्मरणीय ठरली. निळूभाऊंचा कुठलाही अभिनिवेश आणि आव नसलेला,सहजसुंदर अभिनय हे मर्मस्थान आहे. त्याच बरोबर मराठी चित्रपटात त्यांनी अस्सल ग्रामीण बोलीभाषा आणली. तर याबाबतच आपण या भागामध्ये निळूभाऊंचा कलेबाबतचा आणि अभिनयाबाबतचा दृष्टीकोण जाणून घेणार आहोत .
निळूभाऊ अभिनय म्हणजे काय असं तुम्हाला वाटतं ? तुम्ही अभिनयाची व्याख्या कशी कराल ?
निळूभाऊ : खरं मला विजया मेहतांनी अभिनयावर जे भाष्य केलय ते मला अधिक जवळचं वाटतं. त्या असं म्हणाल्या की अॅक्टिंग नाही, रिअॅक्टिंग. रिअॅक्ट होणं हा अभिनय. आपण खरं रिअॅक्ट होत असतो. समोरचा माणूस जे काही बोलतो त्याच्यावर आपण जी काही रिअॅक्शन देतो तो खरा अभिनय. त्याला अभिनय म्हणावं. आणि माझा सगळा अभिनय तसा आहे अशा प्रकारचे विजयाबाईंचे माझ्या अभिनयाबाबतचे मत आहे. मलाही असं वाटतं किंवा त्याला अशी जोड मी देईन की जे पात्र मला करायला सांगितलेलं आहे त्या पात्राची काय पाळंमूळं असतील, हा नेमका असं का वागतो, हा आला कुठून असेल, याची भाषा कशी असेल, हा वागतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा याचा विचार मी करतो. मी केलेली बरीशची कामं ही ग्रामीण भागातल्या तालुका आणि जिल्हा पातळीवरच्या पुढ्यार्यांची होती. ही सगळी मी फार जवळून सेवादलात असताना पहिलली होती. त्यामुळे ती मला इतकी सहज सोपी गेली काम करायला. कारण त्यांचं वागणं, बोलणं याच्यामध्ये एक प्रकारचं ढोंग होतं. त्याच्यामध्ये एक मिष्किलपणा होता. आणि त्याच्यामध्ये नाही म्हंटलं तरी अगदीच देशाविषयी प्रेम नाही असही नव्हतं. परंतु हे सगळं करत असताना जी जी व्यवस्था निर्माण होईल त्या व्यवस्थेमध्ये मी कुठं असेन ही जी आत्मकेंद्री भूमिका आहे, अतिशय स्वत :विषयी जागृत. या सगळ्या ज्या घडामोडी घडतील, या घडामोडीमध्ये माझं स्थान काय असणार ? याकरिता जे सगळे डावपेच आहेत अशा स्वरूपाचा एकदा विचार झाला की मला पुढचं पुढारी करणं भयंकर सोपं जायचं.
अतुल पेठे : म्हणजे तुमच्यासाठी निरीक्षण (observation) हे अतिशय महत्वाचं आहे .
निळूभाऊ : हो हो .
अतुल पेठे : तुमच्या अभिनयाच्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रभाव कोणाकोणाचे वाटतात? म्हणजे पहिल्या काळामध्ये आपण भारावून जातो ज्यांच्या अभिनयाने असे तुम्हाला कोण कोण लोक वाटतात?
निळूभाऊ : खरं मामा पेंडसे आणि बाबुराव पेंढारकर. आणि ग्रामीण भाषा खर्या अर्थाने – म्हणजे घरंदाज ग्रामीण माणूस मी पाहिला तो चिंतामणराव कोल्हटकरांचाच. त्यांचा तो कोट, त्यांचा तो फेटा बांधण आणि त्यांच्यामध्ये एक सहजपणे माणसाकडे पाहण्याची त्यांची एक नजर आहे. ती फार सुंदर आहे . अतिशय उत्तम सहजता. ज्याला आपण असं म्हणू की ग्रामीण माणूस कसा वागतो,कसा बोलतो याचं प्रत्यंतर मला चिंतामणरावांच्यामध्ये दिसलं.
अतुल पेठे : आणि मामा पेंडसे ?
निळूभाऊ : ‘मामांचा सवाई माधवरावांचा मृत्यु’ मध्ये मी जो नाना फडणीस पाहिला, तसा नाना मी पाहिलाच नाही. नानांचे पात्र अनेकांनी केले असेल परंतु मामांनी जे केलं ते मला खूप भावलं. त्यांची शरीरयष्टी आणि त्यानंतर एक अतिशय माणसाकडे न्याहाळण्याची तीक्ष्ण नजर. माणसाकडे ज्या पद्धतीने ते बघत राहतात. त्यांचा एक धाक असतो नजरेमध्ये. हा सगळा मामांनी त्या नानाच्या भूमिकेत दाखवला होता. मामांची नजरफेक. मामा ज्या पद्धतीने त्या समोरच्या पात्राला बघत असे. मी पाचव्या सहाव्या लाइनमध्ये तिकीट काढून बसलेला पण मला त्रास व्हायचा. अतिशय खोलातले प्रश्न विचारायचे पण इतक्या सहजपणे विचारायचे की आपण कोणाला विचारतो की ‘चहा घेतलात का?’ तसे ते ‘यांना भेटलात काय?’ असे विचारायचे. आता याच्यामध्ये जे राजकारण आहे किंवा जो डावपेचाचा भाग आहे किंवा एक एक महत्वाची बातमी बाहेर काढायची आहे. तर हे मामांनी फार गोड दाखवलं होतं. बाबूरावांच्यामध्ये आवाजाची एक अतिशय उत्तम अशी जाण होती. आवाजाचे चढउतार फारच अफलातून होते. बाबूरावाना मी पाहिलं की कमीतकमी हालचाली, मुद्राभिनय आणि आवाज याच्या जोरावर बाबुराव आपली कामे वठवत असत. अतिशय सहजपणे. त्यांचा व्हिलन हा एक विनोदी व्हिलन असायचा. ते जे खवचट बोलायचे ना त्यातुन प्रेक्षकांना राग नाही यायचा. त्यातून हसू निर्माण व्हायचं . आणि मला असं वाटतं की मी ज्या पद्धतीचा व्हिलन करत गेलो त्याच्यामध्ये त्याचं बरचसं श्रेय या मंडळींचं आहे .
अतुल पेठे : पण लहानपणी नाटकं, खेळे-मेळे, दशावतार, तमाशे तुम्ही बघितलेत?
निळूभाऊ : हो. खरं आम्ही तमाशावरच पोसलेली मंडळी. कारण जत्रा ज्या व्हायच्या , उरूस व्हायचे, त्याच्यामध्ये तमाशे व्हायचे. त्यातली जी काही मंडळी होती विशेषत: तांबे, तुकाराम खेडकर, किशा कुसगावकर. किशाबद्दल तर तात्या मला नेहमी म्हणायचे ‘अरे हा किशा कुसगावकर म्हणजे महाराष्ट्राचा चार्ली चॅप्लिन आहे’. इतका उत्तम नट. आणि मी त्याला पाहिलं. त्याची कामं पाहिली. अक्षरशः आठ – दहा हजार प्रेक्षकांसमोर तो ‘मिठ्ठाराणी’ मध्ये तो करत असे. त्यावेळेला हीरो हिरोईन कडे लक्ष नसायचे. लोकांचं लक्ष सगळं किशा कुसगावकर कुठे बसलेला आहे त्या कोपर्यात. कोपर्यात बसून तो या सर्वांच्या ज्या काही घडामोडी त्या रंगमंचावर चालू आहेत त्याच्यावर भाष्य करायचा. ते भाष्य ऐकण्यासाठी अक्षरशः आठ-आठ , दहा-दहा हजार माणसं टपलेली असायची. एखाद्या दुसर्या वाक्याला त्याच्या हालचालीला लोक दाद द्यायचे . अतिशय उत्तम नट .
अतुल पेठे : या सगळ्याचा तुमच्या अभिनयावर प्रभाव पडला.
निळूभाऊ : हो. मला असं वाटतं की यातूनच आपण प्रगल्भ होत जातो . शिकतो. नाहीतर नट काय शिकेल ? आणि माझ्या सुदैवाने माझ्या मित्राचे वडील होते मोदी साहेब. ज्यांची सिनेमाची थेटर्स होती. इंग्रजी चित्रपट त्या ठिकाणी लागायचा. त्यावेळेचं हॉलीवूड इतकं खराब नव्हतं. आजकालचं हॉलीवूड मला फारसं भावत नाही. परंतु हॉलीवूडच्या त्या काळामध्ये अतिशय उत्तम फिल्म्स निघत. भाषा कळत नव्हती इंग्रजी. पुस्तकं वाचायची. शांताबाई समजून सांगत असत. ते सगळं घेऊन जायचं आणि मग फिल्म पाहायच्या. यातून मग अभिनय म्हणजे काय वगैरे. मला असं वाटतं की आम्हाला त्या अर्थाने गुरु कोणीच नव्हता. तशा स्वरुपाच्या संस्थाही त्या काळामध्ये नव्हत्या . या मंडळींनी आम्हाला थोडं अधिक समृद्ध केलं. मी अभिनय शिकलो किंवा ज्याला आपण म्हणतो की थोडफार आपण अनुकरण करायला शिकलो तर या सगळ्या इंग्रजी चित्रपटातून. आणि तमाशा, मामा पेंडसे, बाबुराव पेंढारकर यांचं काम मी जवळून पाहिलं. चिंतामणरावाना पाहिलं
अतुल पेठे : तुम्ही जेव्हा एखाद्या भूमिकेची तयारी करता तर कशा पद्धतीने तुम्ही त्या भूमिकेला भिडता ? म्हणजे जर तुम्हाला नाटक वाचून दाखवलं किंवा चित्रपटची पटकथा वाचून दाखवली तर तुम्ही भूमिका समजाऊन कशी घेता ? ती अभिव्यक्त करण्यासाठी काय काय कष्ट घेता ?
निळूभाऊ : मी पाहतो की हा माणूस म्हणजे ते पात्र असं का वागलं असेल. ते आलं कुठून. त्याचा शेवट काय. त्याची माणसांशी म्हणजे इतर पात्रांशी वागण्याची पद्धत काय आहे. मानसिकदृष्ट्या हा काय पद्धतीचा माणूस आहे. कसली सुख दु:ख त्यांनी भोगली की त्याची रिअॅक्शन त्याच्या आयुष्यावर घडते आहे आणि तो इतर पात्रांशी असं वागतो आहे. याच्याविषयीचा विचार मी नीटपणे करतो. सखाराम बायंडर करताना मला खूप त्रास झाला. मला सखाराम समजायचाच नाही. मला असं वाटायचं की हा काय असं तिरसट काय वागतो ? तर त्याच्यामध्ये समाजानं, कुटुंबांनं त्याची जी अवहेलना केलेली आहे ; बापाने केली आहे ; आईने केली आहे ; समाजाने केलेली आहे. आणि तसा माणूस परखड आहे. स्वत:च्या जीवनाचे एक तत्वज्ञान आहे आणि असत्य काही नाहीये. जे खरंखुरं आहे, जीवन जगतो आहे ते परखडपणे लोकांपुढे मांडण्याची हिंमत आणि तो खरेपणा त्याच्याकडे आहे. त्यामुळे तो कायम थोडा उद्धट, मुजोर असा आहे. विवाहसंस्थेबद्दलची त्याची मते आहेत की हे सगळं खोटं आहे. यात काही अर्थ नाही. निरर्थक आहे. जोपर्यंत एखाद्या स्त्री पुरुष संबंधांमध्ये शारिरिक आकर्षण आहे तोपर्यंत त्यांनी एकत्र राहावं नाहीतर सोडून जावं इतकी स्पष्ट मतं असलेला माणूस. मग ते थोडसं जाणवायला लागलं की याच्यामधला हा बिंनंधास्तपणा आहे. फटिंग माणूस. सगळं फाट्यावर मारणारा माणूस आहे हा. तो कळायला लागला .
अतुल पेठे : पण या व्यक्तिरेखा करत असताना त्या भाषेवर तुमचं प्रभुत्व आहे. तुम्ही ज्या पद्धतीने इतकं सहज बोलता की तुम्ही बोलताय की पात्र बोलतंय कळत नाही. ही भाषा तुम्ही कशी आत्मसात करता? म्हणजे सुरवातीला तमाशातील भाषा असेल, वसंत सबनिसांची भाषा असेल, कलापथकातील भाषा असेल तिथून एकदम विजय तेंडुलकरांची भाषा पेलणं. हे तुम्ही कसं साध्य करता ?
निळूभाऊ : तेंडुलकरांची भाषा. त्यातलं गणित समजून आलं ना तर अतिशय सोपी गोष्ट. पण तेंडुलकरांची भाषा नटाला भयंकर त्रासदायक आहे. तर त्याची एक लय आहे. तेंडुलकरांच्या भाषेची. फार छोटी छोटी वाक्य आणि त्या वाक्यांमध्ये सुद्धा एक अनघड आणि अवघड ठिकाणी दिलेला पॉज. याने तेंडुलकर त्या आशयाला खूप समृद्ध करतात. तर हे जरा समजून घेतलं ना मग खूप सोपं जातं. मी तेंडुलकर म्हणजे सकाळ संध्याकाळ जे त्यांचे पॅराग्राफ्स होते. अवघड वाटायचे. ते मी सहज मित्रांशी बोलता बोलता सहज बोलत राहिलो. आणि यातून माझी रिहर्सल फार चांगली झाली. वाक्याच्या मध्येच मी असा मोठ्ठा पॉज घ्यायचो की ते सगळे माझ्याकडे बघत राहायचे. मी म्हंटलं ही तेंडुलकरांची भाषा जाणून घेऊन रंगमंचावर काम करताना हे असं जर काही केलं ना तर आपण तेंडुलकर प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहचवू शकू .
अतुल पेठे : क्या बात है ! पण असं सर्वच लेखकांच्याबाबत करायचात ?
निळूभाऊ : नाही. सर्वच नाही. तेंडुलकरच मला थोडे अवघड वाटले .
अतुल पेठे : ‘सूर्यास्त’ मधला जो आप्पाजी होता, त्याची तुम्ही काय तयारी केली होती ?
निळूभाऊ : ते तर खरं म्हणजे मी भाऊसाहेब रानडेच केला. भाऊसाहेब रानडे हे त्यावेळेसचे आमचे दलप्रमुख होते. भाऊसाहेब अतिशय प्रेमळ आणि अतिशय संतापी. त्यांना कोणी लबाडी केली, कुठं गैर वागला की त्यांना त्यांना ते खपत नाही. आणि त्यानंतर चिडलेले भाऊ आणि आप्पाजी. मी भाऊ जे जे करत असत ना त्याची नक्कल करत होतो. सूर्यास्त मधली प्रत्येक घटना करत असताना भाऊ कसे वागले असते, भाऊ काय म्हणाले असते ,कसे झरझर चालले असते, भाऊने हातवारे कसे केले असते, या सगळ्याचा विचार करून मी तो बसवला होता. आणि मग मी थोडसं – माझ्यातला नटही त्याच्यात स्वत: काही भर घालत होता .
अतुल पेठे : तुम्हाला नाटकातील अभिनय आणि सिनेमातील अभिनय वेगळा दिसतो का ? काय जाणवतं ? त्याची मर्मस्थानं काय आहेत ?
निळूभाऊ : एकतर खरं म्हणजे चित्रपटामध्ये, इतर जे घटक असतात, उपकरणे असतात, त्यापैकी तुम्ही एक उपकरण असता ; असं मी चित्रपटाच्या नटांबद्दल मानतो. कारण ते दिग्दर्शकाचं माध्यम आहे. नाटकं करणं हा विलक्षण अनुभव. नाटकात काम करणं मला स्वत: ला खूप आवडतं. मला चित्रपटात काम करणं तितकसं आवडत नाही. कारण त्याचे काय इतके कटींग असतात. त्याला पुढचे मागचे संदर्भ, यासगळ्या गोष्टीनी इतका तुटकपणा त्यात आलेला असतो की काम करताना खरं ते अवघड आणि त्रासदायक जातं.
अतुल पेठे : ते तुम्ही जमवून कसं घेतलत ? त्या तंत्रावरसुद्धा तुमची हुकूमत आहे .
निळूभाऊ : जमवून घेतलं म्हणजे काय तर त्याला कष्ट फार पडले. पण ते सुखावह नाहीत असं मला वाटतं. ते काम करताना फार आनंद नाही होत तुम्हाला. जो नाटकात येतो. तुम्ही नाटकामध्ये – म्हणजे मी अगदी असं म्हणत नाही की मी त्यात पार डुबून गेलो वगैरे – कारण माझं नेहमीच याबद्दलचं मत आहे की प्रत्येक नट रंगभूमीवर काम करत असताना ७०% भूमिकेत असतो आणि ३०% आपण काय करतोय त्याचे परिणाम प्रेक्षकांवर काय होतात याचं भान त्याला असतं.
अतुल पेठे : म्हणजे भूमिकेत बुडून गेला वगैरे खोटी गोष्ट आहे .
निळूभाऊ : छे छे . बुडून जायचं वगैरे म्हणजे एकदम – मी तर म्हणतो की माझं लक्ष असतं की मी जे काही आत्ता केलं त्याला कसा प्रतिसाद मिळतोय.
अतुल पेठे : म्हणजे भान असणं.
निळूभाऊ : हो. कुठल्याही नटाला ते असणं गरजेचे आहे .
अतुल पेठे : आणि तेच भान सिनेमाच्या संदर्भामध्ये कॅमेराचं असणं गरजेचे आहे .
निळूभाऊ : हो हो .
अतुल पेठे : तुम्ही चित्रपटात ज्या अनेक भूमिका केल्या त्यापैकी तुम्हाला आवडणारी अशी कोणती भूमिका आहे ज्यात तुम्हाला वाटतं की तुमच्या अभिनयाचा कस लागला ?
निळूभाऊ : चोरीचा मामला. त्यातला जो तो हमाल आहे, हातगाडीवला आहे, तो मला जास्त आवडतो. कारण हे सगळं माझ्या आयुष्याशी खूप मिळतं जुळतं आहे. ती सगळी कष्टाची कामे मी केलेली आहेत. केलेली होती. त्यामुळे तो कसा वागेल, कसा बोलेल हातगाडी सोडल्यानंतर तो खाली बसल्या बसल्या खांद्यावरचा कपडा घेऊन पहिल्यांदा तोंड पुसेल, डोक्यावरची टोपी काढेल, पाण्याचा शिपकारा मारून घेईल या सगळ्या गोष्टी मी स्वत:च अनुभवलेल्या असल्यामुळे मला ते सोपं गेलं.
अतुल पेठे : सामना मधील जो सहकार सम्राट होता ज्याने अख्ख्या चित्रपटसृष्टीतल्या पुढार्याचे रूपच बदलले त्याच्याविषयी तुम्ही काय तयारी केली होती किंवा तुमच्या मनामध्ये काय होतं ? तीही पटकथा तेंडुलकरांचीच होती.
निळूभाऊ : हो. अशी माणसे मी पाहिली होती. त्यांचा दरारा. दरारा या अर्थाने की भिन्नमतवादी मंडळी ही त्यांच्या कोशात बसतच नव्हती. त्यांच्यापेक्षा भिन्न मते मांडणारा माणूस हा एकतर नाहीसा करून टाकणं – या पाठीमागे जी दहशत आहे, दरारा आहे, तो दरारा मी जाणून घेतला होता. की अशा माणसांच्या विरोधामध्ये सर्वसामान्य माणूस उलटा बोलूच शकत नाही. त्याच्या विरोधामध्ये तो कधीही आपलं मत मांडू शकत नाही. आणि मग ती जी गोची सगळ्या अवतीभोवतीच्या माणसांची होते. ते सगळं अतिशय आपल कर्तृत्व आहे असं अतिशय एक मुजोरपणा आणि त्याचा गर्व करणारा, अभिमान करणारा वगैरे.. ही जी पुढारी वृती आहे ही मी जवळून पाहिलेली होती .
अतुल पेठे : तुम्ही त्या चित्रपटात डॉक्टर लागुंच्या बरोबर होतात. पण त्याचबरोबर तुम्ही इतक्या चित्रपटांमधून विविध उत्तम अभिनेत्यांबरोबर होतात . अगदी अमिताभ बच्चनपर्यंत. दादा कोंडके असतील. अशोक सराफ असेल . तर तुम्हाला कोणता तुमचा समकालीन, तुमच्या बरोबरचा अभिनेता आवडतो आणि त्याचे गुण कुठले कुठले वाटतात ?
निळूभाऊ : एकतर डॉक्टरांच्या बरोबर तीन चार फिल्म तरी मी केल्या. नाटकं फार केली नाहीत. एक दोन नाटके केली. काही नट मंडळी तुमच्यासमोर काम करत असताना रिअॅक्ट होत नाही. तसं डॉक्टरांचे होत नव्हतं. डॉक्टर तुमचं प्रत्येक शब्द नं शब्द नीटपणे ऐकून रिअॅक्ट होत होते. आणि जोपर्यंत असं समोरचा नट रिअॅक्ट होत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या माणसाला खूप अडचणीचं वाटतं. डॉक्टर या बाबतीमध्ये सहकलाकार म्हणून फार उत्तम आहेत.
अतुल पेठे : त्यामुळे तुमचं त्यांच्याबरोबर रसायन फारच जुळलं होतं.
निळूभाऊ : हो. ते उघडच आहे. साधी गोष्ट आहे. माझं बोलणं ऐकायचच नाही तर कसं होईल ? काही नट मी पाहिले. ते दिव्याकडे बघत बसतील . आरश्याकड बघत बसतील. उगीच खाकरतील वगैरे. ही जी अभिनयाची पद्धत आहे ती अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे असे मी मानतो. जी दोन पात्र बोलत आहेत एकमेकांच्या संदर्भामध्ये, एखाद्या घटनेवर संवाद करत आहेत , त्याच्यामधला प्रत्येक शब्द मी समोरच्या नटाचा ऐकून घेणं आणि त्याच्यावर रिअॅक्ट होणं. नाटक जर चांगलं करायचं असेल, प्रयोग जर चांगला समृद्ध करायचा असेल तर ही फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं . डॉक्टरांच्या बाबतीमध्ये माझा अनुभव असा आहे की डॉक्टर या बाबतीमध्ये खूप सजग असायचे .
अतुल पेठे : तुमच्या मघाच्या बोलण्यात असं आलं की बोलणं, पाहणं आणि ऐकणं हा समर्थ अभिनय करण्यासाठीचा स्त्रोत आहे. वाचन तुमचं अतिशय उत्तम दर्जाचे आहे. अभिनयासाठी जाणूनबुजून काय प्रकारचे वाचन तुम्ही वाढवलत ?
निळूभाऊ : बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथेपसून खरी मी सुरवात केली. शांताबाई (शेळके) आल्या आयुष्यामध्ये. ती जी वर्ष दीड वर्ष शाळेमध्ये शांताबाई बरोबर गेली,त्याकाळात शांताबाईनी काय वाचावं आणि काय चांगलं आहे, काय खोटं आहे या सगळ्या गोष्टींची जाण करून दिली, मला वाटतं की तिथून मग माझ्या वाचनामध्ये प्रगती झाली. मला इतिहास आवडायला लागला. आत्मचरित्र आवडायला लागली. कविता मी कधीच वाचत नव्हतो पण मला कवितेतले अर्थ जाणवायला लागले. हे सगळं नाही म्हंटलं तरी शांताबाईंचच ऋण आहे .
अतुल पेठे : कुठली कुठली पुस्तके किंवा लेखक तुमचे खास आवडतीचे आहेत ?
निळूभाऊ : एकतर ते मराठी आणि हिन्दी पुरते मर्यादित आहेत. कारण इंग्रजी बिलकुल मला येत नाही आणि इंग्रजी वाचन मला भयंकर अवघड जायचं. अवघड जायचं म्हणजे डिक्शनरी बाजूला ठेऊन कुठल्या साहित्यकृतीचं काही होऊ शकत नाही. व्यंकटेश माडगुळकर, जी.ए.कुलकर्णी, पानवलकर, त्यानंतर कवितांमध्ये कोल्हटकर, त्यानंतर ही आता काही नवी दासू वैद्य सारखी मंडळी. त्यानंतर केशवसुत मला आवडतात. आपल्या कवितेतून त्यांनी जो विचार मांडला तो फार महत्वाचा वाटतो. कुसुमाग्रजांची क्रांतीची गीते. मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या बेचाळीसच्या काळामध्ये सगळी कुसुमाग्रजांचीच गीतं त्या चळवळीमध्ये म्हंटली जायची. विशेषत: ते आईला उद्देशून म्हंटलेल जे क्रांतीगीत आहे ते….तर याचे प्रभाव माझ्यावर आहेत .
अतुल पेठे : त्यातूनच खरतर तुमची भाषा घडली असे म्हणता येईल. तुमचं राजकीय वाचन अतिशय उत्तम आहे. राम मनोहर लोहिया वगैरे .एका ठिकाणी तर मी वाचलं होत की तुम्ही बॅरिस्टर जिनांवर तर दोन तास अखंड भाषण दिलंत.
निळूभाऊ : जिना. आता कोण होते जिना ? मला जिना आणि सावरकरांच्या विषयी भयंकर आश्चर्य वाटते. दोघेही नास्तिक. धर्मावर, कर्मकांडावर ..जे कालबाह्य झालेलं आहे त्याच्यावर अतिशय प्रखर टीका करणारे दोघेही पुन्हा धर्माचाच आधार घेऊन फाळणीची भाषा बोलतात. त्यामुळे मला आश्चर्य वाटतं की माणसांमध्ये एवढा बदल. आणि गम्मत तीच आहे. जिनांचे आयुष्य तर अतिशय क्लेशकारक आहे. अतिशय केविलवाणे आहे. कारण त्या माणसाचे कसे झाले की त्याला पाकिस्तान हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र करायचे होते. आणि एकदा त्यांचं आजारपण सुरू झाल्याबरोबर त्यांच्या अवतीभोवतीच्या लोकांनी त्यांच्या विचाराना बाजूला सारून ज्या पद्धतीने पाकिस्तान घडवला तो त्यांच्या आयुष्यातला अतिशय क्लेशकारक अनुभव असावा. त्यांच्या घरामध्ये कोणीही मुस्लिम घरात लग्न केलेलं नाही .
अतुल पेठे : जिना तुमचा मुखोद्गत आहे .लोहिया तुमचा मुखोद्गत आहे. तुम्ही ऐकता अतिशय चांगलं. संगीताच्या विषयक तुम्हाला रुची आहे. एकंदर आपली जाण, रुची वाढवणं, दृष्टीकोण विकसित करणं, याकरिता तुम्ही अनेक तर्हेने प्रयत्न केलेले आहेत आणि ते अर्थातच एक चांगला समर्थ अभिनेता होण्यासाठी उपयुक्त ठरले. निळूभाऊ, अभिव्यक्ती स्वातंत्र्यबद्दल आत्ता चर्चा सुरू आहे . याबाबत सखाराम बायंडर, घाशीराम कोतवाल या नाटकांच्या बाजूने तुम्ही उभे होतात. तर या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतचा तुमचा मुद्दा ऐकायला आवडेल आणि त्यानंतर मी तुम्हाला अतिशय मनापासून विनंती करेन की अभिनयाचा एक तुकडा म्हणून, वाचिक अभिनयाचा एक नमूना, एक पाठ म्हणून सखाराम बायंडर या नाटकातला एक उतारा तुम्ही सादर करावा .
निळूभाऊ : (मिश्किल हसत) हो हो. अवश्य.
अतुल पेठे : त्याआधी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतची तुमची भूमिका काय ?
निळूभाऊ : खरतर आम्ही लोकांनीच झगडा केला आहे. सखाराम बायंडर पासून आम्ही झगडा करत आलो की कलाकाराचं, लेखकाचं, दिग्दर्शकाचं, कलावंताचं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये. तुम्ही फार तर त्याच्यावर वाद घालू शकता. तुम्ही लोकांना निदर्शने करायल सांगू शकता. तुम्ही हे नाटक बघू नका असं सांगू शकता. परंतु तुम्ही एखादा नाटक चालू आहे ; ते आत जाऊन धसमुसळेपणाने बंद पाडण्याची जी क्रिया आहे ही चुकीची आहे. अभिव्यतीच्या स्वातंत्र्याबाबत मला म्हणायचे आहे की मला गांधीजींचे एक वाक्य खूप आवडते. ते असे की ‘चुका करण्याचेही स्वातंत्र्य माणसाला असले पाहिजे.’ मला वाटतं की या वाक्यामध्ये सगळच आलं. कदाचित चूक असेल आम्ही जे मांडत असू किंवा जे लिखाण असेल. जो विचार असेल तो चुकीचाही असेल. समाजधारणेकरिता निरुपयोगीही असेल. परंतु व्होल्टेयर म्हणतो की, ‘मला माहीत आहे की तुझ्या मताशी मी मुळीच सहमत नाही पण तरीसुद्धा तुला बोलण्याचा अधिकार आहे आणि या अधिकाराकरिता संघर्ष झाला तर मी तुझ्या पाठीशी आहे.’ हा विचार मला पटतो .
अतुल पेठे : निळू फुले या बहूआयामी व्यक्तिमत्वाचा परिचय एका मुलाखतीत केवळ करून घेणं अशक्य आहे. मराठी नाटक आणि चित्रपटातं अभिनयाची व्याख्या नव्याने घडवणार्या या मराठी मातीतील अस्सल आणि अव्वल अभिनेत्याला आम्ही सारे कलावंत आणि आपण सारे श्रोतेही म्हणूनच आदरपूर्वक सलाम करतो . या कार्यक्रमाचा शेवट मी सखाराम बायंडर या नाटकातील उतारा निळूभाऊंनी वाचून दाखवावा अशी त्यांना विनंती करतो .
(निळूभाऊ सखाराम बायंडर नाटकातील पहिलाच उतारा थोडी पार्श्वभूमी सांगून खास सखारामाच्या मुजोर आवाजात सादर करतात.)
अतुल पेठे : वाह वाह ! निळूभाऊ तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी गप्पा केल्या त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो.
निळूभाऊ : फार आभारी आहे .
समाप्त.
शब्दांकन : कृतार्थ शेवगावकर
छायाचित्र : कुमार गोखले ( प्रेमाची गोष्ट? या नाटकाच्या तालिमीदरम्यान निळूभाऊ फुले,डॉ.श्रीराम लागू आणि अतुल पेठे)