6 वर्षांपूर्वी बरतोल्ट ब्रेख्त लिखित आणि Shardul Saraf दिग्दर्शित “अपवाद आणि नियम” या मी काम केलेल्या नाटकाला कोल्हापुरातील शाहू स्मारकामध्ये कॉ.गोविंद पानसरे उपस्थित होते. नंतर पुण्यात येऊन त्यांनी आम्हा कलाकारांसोबत गप्पाही मारल्या होत्या.त्याच शाहू स्मारकाच्या खचाखच भरलेल्या सभागृहात काल गोविंद पानसरेच्या खुनाच्या निषेधात आयोजित केलेल्या स्मृती जागर सभेत ओजस एस.व्ही.लिखित दिग्दर्शित Commedia dell’arte धाटणीच्या “चायवाले की दुकान” या नाटकाचा प्रयोग पार पडला. मा. जावेद अख्तर, मा. तुषार गांधी सहित कोल्हापूरकर रसिक मंडळींनी प्रयोगाला उत्स्फूर्त दाद दिली. नाटकाच्या शेवटी असलेल्या “हम देखेंगे” या फैज अहमद फैज यांच्या कवितेवर मा.जावेद अख्तर सहित सभागृहातील सर्वांनीच ताल धरला. हे नाटक भाषेच्या आणि प्रदेशाच्या मर्यादा ओलांडून देशभरात जाण्याची गरज आहे अशी इच्छा व्यक्त करत मनमोकळेपणाने त्यांनी आमच्याशी संवाद साधला. माणसाचे साधे आणि जमिनीवर असणे म्हणजे नेमके काय याचा अर्थ काल पुन्हा वेगळ्याने आकळला.
सध्या देशात वाढत असलेल्या सर्व धर्मांध शक्तीबद्दल त्यांनी भाषणामध्ये चिंता व्यक्त केली. “15 करोड(मुस्लिम) असलो तरी 100 करोडला (हिंदूंना) पुरून उरु” असे धर्मांध वक्तव्य करणाऱ्या वारीस पठाणचा त्यांनी कड्या शब्दात निषेध केला. मोहम्मद जिनांसारख्या धर्मांध मानसिकतेचे लोक अजूनही या देशातल्या हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांमध्ये दुफळी माजवण्याचा प्रयत्न करत आहेत असे खेदाने सांगत ” 15 करोड मुस्लिम भगिनी बांधवांचा ठेका तुम्हाला कोणी दिला ?” असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटत फिरणाऱ्या गल्लोगल्ली तयार झालेल्या स्वघोषित भगव्या देशभक्ती एक्सपर्ट वरही टीका करत त्यांनी खेद व्यक्त केला. हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार करून,विचारवंतांच्या खुनाचा आणि सर्व प्रकारच्या हिंसेचा जाहीर निषेध करत,विवेकाचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार करून ही सभा संपन्न झाली.
जावेद अख्तर यांनी खांद्यावर ठेवलेला हात अजून जोमाने काम करण्यासाठी ऊर्जा देऊन गेला.
