प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री कनी कुसृती यांना त्यांच्या 18 व्या वाढदिवशी म्हणजे 12.09.2003 रोजी वडील मैत्रेय यांनी मल्याळम या त्यांच्या मातृभाषेत एक पत्र लिहिलं. त्याच्या इंग्रजी भाषांतरावरून मी त्या पत्राचा मराठी अनुवाद केला आहे. अतिशय सुंदर पत्र आहे.नक्की वाचा. हे पत्र आमच्यापर्यंत पोहचवनाऱ्या मैत्रा चे आभार. Thank you Maitreya Maitreyan for such a wonderful words. Also Thanks to Kani Kusruti.
-कृतार्थ शेवगावकर
तिरूअनंतपुरम – १२.०९.२००३
माझी प्रिय मुलगी कनी ,
आज , तू वयाची १८ वर्षे पूर्ण करते आहेस. भारतीय संविधानानुसार तू प्रौढ झाली आहेस आणि तुला तुझे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. आत्तापर्यंत तुझ्या पालनपोषणात भाग घेतलेली एक महत्वाची व्यक्ती म्हणून मला तुला काही आधार आणि आश्वासनं द्यायची आहेत आणि त्याचबरोबर तुझे हक्क, अधिकार आणि जवाबदर्या यांचीही तुला जाणीवही करून द्यायची आहे.
वेगवेगळ्या जाती, धर्मश्रद्धा, वंशश्रद्धा, राजकीय विचारधारा आणि पितृसत्ताक विशेषाधिकार असलेल्या या समाजात तुला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून वावरायचं आहे. इथे पाय रोवणं तितकं सोपं नाही . काय चांगलं आणि काय वाईट हे ठरवण्याच्या द्विधा मनस्थितीच्या क्षणांमधून तुला सहज निसटता यावं म्हणून तुला हे पत्र मी लिहीत आहे .
या समाजात पाळले जाणारे बहुसंख्य नियम, हे पुरुषांनी, स्त्रियांना दुय्यमत्व देऊन त्यांना स्वत:च्या ताब्यात ठेवण्यासाठी, स्वत:च्या सोयीनुसार आखलेले आहेत.त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्यावर गदा आणलेली आहे.
तुला ठाऊक असलेला स्वातंत्र्याचा अर्थ आणि संवेदना या पुरुषप्रधान व्यवस्थेसाठी त्रासदायक आहे. म्हणून मी तुला जाणीव करून देतो की तुला वारंवार या पुरुषी प्रतिक्रियांचा सामना करावा लागेल. मला विश्वास आहे की माझी आश्वासनं तुझे शारीरिक आणि मानसिक बळ वाढवून या पुरुषी प्रतिक्रियांचा परिणाम कमी करण्यासाठी तुला मदत करतील.
– तुझ्या घर सोडून जाण्याच्या आणि वेगळं राहण्याच्या हक्काला माझा सर्वतोपरी पाठिंबा आहे .
– तुझ्या निवडीच्या कोणत्याही व्यक्तीसोबत – पुरुष, स्त्री किंवा ट्रान्सजेंडर – लैंगिक संबंध ठेवण्याच्या तुझ्या हक्काला माझा पाठिंबा आहे.
– सध्याच्या सामाजिक नियमांनुसार एखाद्या स्त्रीला गर्भवती राहून बाळाला जन्म द्यायचा असेल तर ‘बाप’ दाखवणे गरजेचे आहे. या विरोधात जाऊन तुला कोणत्याही पुरुषाविना स्वत:च्या निवडीने बाळाला जन्म द्यायचा असल्यास – तुझ्या त्या हक्कासाठी मी तुझ्या पाठीशी उभा असेन.
– जर तुझ्या मर्जीविरुद्ध तू गरोदर (Pregnant) राहिलीस तर तुला गर्भावस्था नाकारण्याचा (Abortion) चा पूर्ण हक्क आहे.
– तुला कोणत्याही प्रकारचे कपडे निवडण्याचा आणि वाटेल तिथे ते परिधान करण्याचा हक्क आहे. माझा त्याला पाठिंबा आहे.
– नात्याच्या किंवा सहजीवनाच्या एखाद्या टप्प्यावर तुला वाटलं तर तू निवडलेल्या आणि राहत असलेल्या जोडीदारासोबत पुढे न राहण्याचा निर्णय घेण्याचा तुला हक्क आहे. या निर्णयस्वातंत्र्याचे मी समर्थन करतो.
– तू एकाच वेळी एकापेक्षा जास्त माणसांच्या प्रेमात पडू शकतेस. मला माहीत आहे की प्रेमभावना ही नैसर्गिक आहे.इथेही मी तुझ्यासोबत असेन.
– कदाचित तू कोणाच्याच प्रेमात पडणार नाहीस. म्हणून तुझ्या एकटं राहण्याच्या हक्कासाठीही माझा पाठिंबा आहे.
– इतर कोणत्याही नागरिकांसारखचं, तुलाही धूम्रपान आणि मद्यपान करण्याचा अधिकार आहे.
– तुझ्या आवडत्या कोणत्याही क्षेत्रात काम करून जगण्याचा तुला अधिकार असून त्यासाठी माझा संपूर्ण पाठिंबा आहे .
मी तुला वचन देतो की – समाजात जगत असताना हे अधिकार आणि हक्क तुला मिळवण्यासाठीच्या कोणत्याही लढाईत मी तुझ्या बाजूने उभा असेन.
आता काही विनंत्या —
– जर तुझ्यावर कधी बलात्कार झाला तर त्याकडे केवळ हिंसा म्हणून बघ. मनावर झालेल्या आघातावर मात करण्यासाठी लागणारी लवचिकता आणि ताकद मिळवण्याचा प्रयत्न कर.
– माझी तुला विनंती आहे की धूम्रपानाची (smoking) सवय लागू देऊ नकोस, कारण त्याने दुसर्याची गैरसोय होऊन त्याला त्रास होतो.तुला मद्यपान करायचे असल्यास संयमाने कर.एखादा गुन्हा करत असल्यासारखे लपूनछपून करू नकोस.
– राजकारण, धर्म, वंश, लिंग, रंग, प्रदेश, जात किंवा भाषा या मुद्दयाचा आधार घेऊन दुसर्यांविषयी द्वेष करायला शिकवणार्या कोणत्याही विचारधारेचा कधीही स्वीकार करू नकोस.
– आपल्या नुसत्या असण्यामुळेही एखाद्याला त्रास होऊ शकतो हे मला माहीत आहे.परंतु कोणालाही जाणीवपूर्वक आपल्या शब्दांनी ,कृतीने किंवा अगदी नजरेनेही दुखवू नकोस. तुझ्यावर बलात्कार केलेल्या माणसाचाही तिरस्कार करू नकोस.असा प्रयत्न करताना अपयश आल्यास – हा प्रयत्नच जीवनात मिळवलेला एक विजय असेल.
– आपण स्वत:च्या आणि इतरांच्या स्वातंत्र्यासाठी नेहमी झगडा द्यायला हवा.आपला संघर्ष हा कोण्या एका व्यक्ती विरोधातील नाही, तर तो चुकीच्या व्यवस्था आणि अनिष्ट रूढी परंपरांच्या विरोधात आहे.
– संवेदनशील प्रेम करण्याची क्षमता तुझ्यात आहे हे मला ठाऊक आहे. तुझं प्रेम गहिरं असू दे.
– तुझ्या कोणत्याही कृतीची योग्य अयोग्यता तपासण्यासाठी ती कृती प्रेमाच्या फुटपट्टीवर मोजून बघ.
आपण , माणसं , या जगाचे फार थोड्या काळासाठीचे रहिवासी आहोत. आज तुझ्या स्वत:कडे असलेला प्रेमाचा आणि आनंदाचा प्रकाश तसाच कायम तेवत ठेऊन यशस्वी होण्यासाठी मी तुला सदिच्छा देतो. तुझ्याकडे असलेला प्रेमाचा प्रकाश सगळीकडे पसरवून इतरांनाही तु आनंदी कर.
– ‘वडील’पणा सोडून तुझ्याशी वागण्याचा प्रयत्न करणारा तुझा वडील
मैत्रेय
मूळ मल्याळम पत्र : मैत्रेय मैत्रेयन
इंग्रजी भाषांतर : आनंद गांधी आणि मैत्रा
मराठी भाषांतर : कृतार्थ शेवगावकर
