“करके देखो” अर्थात (COVID-19) च्या सुटीच्या काळातील मनाचा व्यायाम.

Share with:


संकल्पना आणि मूळ इंग्रजी लेखन : सोनाली मेढेकर
मराठी भाषांतर आणि शब्दांकन : कृतार्थ शेवगावकर

सर्वाना सप्रेम नमस्कार.
तुम्ही सर्वजण छान असाल अशी आशा करतो. या अचानक मिळालेल्या सुट्ट्या किंवा घरून काम करण्यासाठी मिळालेली सूट तुम्हाला कशी वाटतेय ? मला खात्री आहे की तुम्हाला मिळालेली ही सूट आणि मिळालेला हा मोकळा वेळ तुम्ही स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेत घेत आनंदात घालवत असाल.

तुम्हाला लहान मुल असेल तर या मोकळ्या वेळात त्याला शाळेतल्या बेस्ट फ्रेंडची,शिक्षकांची,खेळाच्या तासाची, बुडणाऱ्या अभ्यासाची आठवण येत असेल.तुम्हालासुद्धा ऑफिस मधल्या रोज भेटणाऱ्या सहकाऱ्यांची,राहून गेलेल्या किंवा अर्धवट राहिलेल्या कामांची आठवण येत असेल.आणि आठवण जर येत नसेल तरी त्या सर्वाची आठवण आणि कामाची जाणीव तुमच्या अचेतन मनात(Subconscious mind)असेलच.तुम्ही व्यावसायिक असाल तर अडकून राहिलेल्या कामामुळे आणि होत असलेल्या आर्थिक नुकसानामुळे वाईट वाटून त्याची चिंता सतावत असेल.कोणाचे शेयर मार्केट मध्ये नुकसान झाले असेल जे भरून यायला थोडा वेळ द्यायला लागेल.परंतु त्याआधीच त्या पैशांची निकड भासली तर काय ? ..याची चिंता असेल.
जे रोजंदारीवर काम करतात,ज्यांचे हातावर पोट असते त्यांच्यासाठी तर किती कठीण असणारा काळ आहे. बाहेरही जाता येत नाही आणि झोपडीतही थांबता येत नाही अशी स्थिती आहे त्यांची.
या सगळ्या आठवणी,जाणिवा,चिंता,अडचणी आपल्याला आहेतच. त्याबरोबर या येऊ घातलेल्या कोरोना व्हायरसच्या आजाराचे (COVID-19) आव्हानही आपल्या सर्वांसमोर आहे.
आपण बहुतेक सर्वजण घरी आहोत.सर्वाना आपल्याला अभ्यासाची किंवा कामाची काहीतरी जवाबदारी आहे,ती पार पाडायची आहे,तुमची रोजची भूमिका तुम्हाला घरबसल्या बजावायची आहे,त्याबरोबरच स्वतःची काळजी घ्यायची आहे वगैरे वगैरे…अशी खूप कामे आहेत.यादी करत बसलो तर खूपच मोठी होईल.असो.

पण मला असं वाटतंय की या सगळ्यासोबतच ही वेळ स्वतःला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठीसुद्धा अतिशय योग्य आहे.आपण कामाच्या ठिकाणी असताना अनेक गोष्टी शिकत असतो.आपल्या ज्ञानात भर पडत असते. तसच कामाचे ठिकाण सोडून आपल्या आजूबाजूला आणि घरीसुद्धा आपल्याला शिकवण देणाऱ्या,आनंद देणाऱ्या,आपलं जगणं फुलवणार्या खूप गोष्टी असतात.कामाच्या आणि इतर धावपळीत आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.एखादं फुल आपल्या बागेत,गॅलरीत फुललेलं असतं पण आपलं त्याकडे लक्ष जात नाही.अनेक दिवसांपासून स्वैपांक शिकायचा असतो, पण युट्युब रेसिपी व्हिडीओ सहित सर्व साधने उपलब्ध असूनही वेळेअभावी शक्य होत नाही.अशा आपल्या “हजारो ख्वाहिशे..” राहून गेलेल्या असतात.तर आता मिळालेल्या वेळेत या हजारो पैकी घरच्या घरी करता येतील अशा 2-4 इच्छा तरी पूर्ण करण्याची संधी आपण घेतली पाहिजे.घ्यावी. खरच तुम्हाला खूप मजा येईल आणि मानसिक स्वास्थ्य ही तंदुरूस्त राहील.

त्याच बरोबर महत्वाचे म्हणजे या काळात आपण वेळ काढून स्वतःच्या मनाशी नीट सविस्तर बोलूही शकतो.ते केलं पाहिजे. शरीर सुदृढ करण्यासाठी जशी शरीराची जिम असते तशी घरीच माईंड जिम करायची .माईंड जिम म्हणजे स्वतःच्या मनाशी बोलायचं.
तुकाराम महाराजांनी म्हंटलच आहे ना :

तुका म्हणे होय , मनासी संवाद !
आपुलाचि वाद आपणासी !

आपले आईवडिलांसोबत,बायकोसोबत,नवऱ्यासोबत,मित्र मैत्रिणीसोबत ,प्रेयसीसोबत,मुलांसोबत नाते कसे आहे हे आपण जरा निरखुन पाहू शकतो.माझ्या वागण्याचा,बोलण्याचा या सर्व नात्यांवर- सकारात्मक किंवा नकारात्मक- काय आणि कसा परिणाम होतोय ही गोष्ट आपण या वेळेत भिंगाखाली घेऊन पाहू शकतो.त्यात असलेले किंवा पुढे समोर येतील असे छोटे-मोठे अडथळे दिसले तर ते बाजूला सारून संवादाने प्रेमाची पेरणी करू शकतो. मला जर एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा/वागण्याचा त्रास होत असेल तर मी त्याला/तिला कसे बरं नीट सांगावे याचा आपण विचार करू शकतो. संवाद साधून तसे सांगू शकतो.छोट्या आणि तकलादू कारणाने निर्माण झालेला आणि संवादाने सहज दूर होणारा अबोला आपण दूर सारू शकतो.

कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या रोजच्या ताज्या बातम्या आपल्याला मिळत आहेतच.पण आपण घाबरूया नको. आवश्यक ती सर्व काळजी आपण सर्व घेऊया.आपल्या संरक्षणासाठी डॉक्टर्स,नर्सेस,इतर जीवनावश्यक सेवा पुरवणारी क्षेत्रे,आपलं सरकार… सगळेच दिवसरात्र लढत आहेत.आपण आपल्या घरात बसून त्यांना हातभार लावूया. आपण बाहेर पडलो तर त्यांचं काम वाढणार आहे आणि आपली सुरक्षितता कमी होणार आहे. फक्त सर्व भारतीयांचीच नाही तर जात,धर्म,भाषा,वर्ण,देश,सीमा हे सगळं ओलांडून जगातल्या सर्व देशातल्या सर्व नागरिकांची पूर्ण सुरक्षितता यालाच आपले प्राधान्य हवे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना : हे विश्वची माझे घर !
आपल्या घरातल्या लोकांची काळजी आपण घ्यायला हवी.

शेवटी सांगायचं काय तर आपण सगळे – स ग ळे – सोबत आहोत.आपल्या प्रियजनांशी आपली भेट जरी झाली नाही तरी जिथे कुठे आहेत तिथून तुमचे आईवडील,बायको,प्रेयसी,शिक्षक, मित्र परिवार,मुलं,ऑफिसमधील सहकारी, तुमचा नोकरदार वर्ग,कामगार,आपलं सरकार हे सगळे तुमच्या सोबत आहेत.आपण सर्वजण जेव्हा भेटू तेव्हा एकमेकांनी घरी काय आणि कसं काम केलं,काय मज्जा झाली,काय अडचणी आल्या याच्या एकमेकांच्या कथा ऐकायलाही उत्सुक आहोत.प्रियजनांशी तात्पुरता संपर्क साधण्यासाठी फोन आणि व्हाट्स अप आहे.
आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि प्रेम आपल्या सर्वांसोबत आहेतच.
काळजी घेऊया आणि आनंदी राहूया.

तर ,
आता आपल्याला एक गंमत करायचीय.
खाली मी तुम्हाला काही प्रश्न पाठवत आहे. या घरी असलेल्या काळात रोजच्या रोज त्याची उत्तरे लिहून काढा.शक्यतो स्क्रिनवर टाईप न करता पेनने वहीत किंवा कागदावर लिहा.अगदीच शक्य नसेल तर स्क्रिनवरही लिहू शकता. हा मिळालेला वेळ किंवा सूट तुम्ही कशी उपयोगात आणली याचा शोध घ्यायला तुम्हाला हे तुमचंच लिखाण उपयोगात येईल. तुमच्या लहानग्यांनाही हे वाचून दाखवा आणि लिहायला सांगा.

१.प्रश्न पहिला :- दिवसभरात मी काय काय गोष्टी केल्या ?
(शक्यतो दिवसभराचे एकत्र न लिहिता आजची तारीख टाकून
सकाळी –
दुपारी-
संध्याकाळी –
रात्री –
काय काय केले हे वेगवेगळे विभागून लिहा. म्हणजे त्यात नेमकेपणा येईल. “मी काहीच केले नाही” किंवा “झोप काढली” असे लिहिले तरी हरकत नाही. जे केले ते लिहायचे. ही काही परीक्षा नव्हे ज्यात तुम्ही पास किंवा नापास होणार आहात. पास-नापास काही नसतं.प्रत्येकाच्या क्षमता आणि प्रतिभेची क्षेत्रं वेगळी असतात इतकंच.)

२.प्रश्न दुसरा :- तुम्ही जे काम केले त्याला तुम्ही किती स्टार देता?
(सिनेमाला जस रेटिंग असतं—3.5 स्टार किंवा 4 स्टार –तसं तुम्हाला तुमच्या दररोजच्या दिवसाला रेटिंग द्यायचं आहे. हे तुमचं तुम्हीच द्यायचे आहे. कोणाला दाखवायची गरज नाही. किंवा दाखवले तरी हरकत नाही. हा स्वतःसाठी करण्याचा व्यायाम आहे.)

3. प्रश्न तिसरा :- आज केलेले काम करताना मला मजा आली का? मजा आली असेल तर मजा का आली आणि नसेल आली तर का नाही आली हे लिहायचे आहे.
( सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्र ही कामाची विभागणी आपण केली आहेच. प्रत्येक कामाबद्दल तुम्हाला हे लिहायचे आहे.)

4. प्रश्न चौथा :- ते काम करताना काही अडचणी आल्या का? कोणत्या ?

5. ते काम अधिक चांगल्या रीतीने करण्यासाठी मला कशाची गरज आहे किंवा अजून चांगल्या रीतीने ते काम मी कसे करू शकेन ?

जमल्यास या सुटीच्या काळात थोडा वेळ काढून हा व्यायाम कराच.
या धावत्या वेगवान शहरात आपलं स्वतःकडे पुरेसे लक्ष नाहीये.नीट श्वासही आपण घेत नाही. भांडवलवादी भौतिक सुखाच्या मागे पळत पळत , भ्रम आणि भासाच्या गर्तेत जगत असताना “अनुभव घेणं” ही क्रिया आपण जवळपास विसरलो आहोत. म्हणून हा पसारा.
“मी वाचलं,मी पाहिलं,मी ऐकलं,मी करून बघितलं आणि मला समजलं” हा मंत्र फार महत्वाचा आहे. एकदा हा व्यायाम करून तर पहा.
महात्मा गांधींनी म्हटलच आहे ना
“करके देखो”.

एक प्रार्थना म्हणून तात्पुरता निरोप घेतो.
सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामया।
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चित् दुःखभाग् भवेत्।।
(सर्वजण सुखी व्हावेत.सर्वजण आरोग्यसंपन्न व्हावेत.
सर्वांचा उद्या उज्वल असो.कोणास दुःख न होवो.)

ताजा कलम : नेमकं कस लिहायचं हे कळण्यासाठी टेबलचा फोटो पाठवत आहे. यात काम म्हणजे तुम्ही काहीही ..म्हणजे अगदी काहीही लिहू शकता. उदाहरणार्थ मी पुस्तक वाचलं, आईसोबत काम केलं,मित्राला पत्र लिहिलं,नवीन जादू शिकलो,बायकोशी गप्पा मारल्या ..थोडक्यात अस काहीही जे तुम्ही केलं असेल.काही कामे तुमच्या एकट्याची असतील.काहींमध्ये सोबतीला काही जण असतील. काही कामे म्हणजे तुमच्यावर असलेल्या जवाबदर्याचा भाग असेल. तुम्हाला हवी तशी तुम्ही यात भर घालू शकता.
काही प्रश्न नको वाटले तर तुम्ही सोडूनही देऊ शकता. सक्ती कसलीच नाही.
तो भाई बहेन लोग… करके देखो !!और कैसा लगा बताओ !!

संकल्पना आणि मूळ इंग्रजी लेखन : सोनाली मेढेकर
(लेखिका या मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक आहेत)

मराठी भाषांतर आणि शब्दांकन : कृतार्थ शेवगावकर

आभार : A School Counsellor casebook by Vikram Patel,Lisa Aronson and Gauri Diwan .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *