निळूभाऊ फुले यांची दुर्मिळ मुलाखत.

Share with:


1995 साली पुणे आकाशवाणी केंद्रासाठी अभिनेते निळूभाऊ फुले यांची मुलाखत नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी घेतली होती. या मुलाखतीत निळूभाऊ फुले यांनी बालपण, शाळेत मराठीच्या शिक्षिका असलेल्या शांताबाई शेळके, राष्ट्र सेवा दल, कलापथकातील नाटके ,त्यांचे विषय ,अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीतील त्यांची भूमिका,अभिनयाची व्याख्या, त्याची प्रभावक्षेत्रे, भूमिकेची तयारी,पात्राच्या भाषेवर काम करण्याची त्यांची पद्धत,नटाने कसे असावे याविषयीचे त्यांचे म्हणणे – अशा अनेक विषयांवर अतिशय मोकळेपणाने संवाद साधला आहे.अभिनय करणाऱ्यांसाठी ती महत्वाची वाटली म्हणून त्या मुलाखतीचे शब्दांकन मी केले आहे.नक्की वाचा.
-कृतार्थ शेवगावकर

वाचनवेळ – 20 ते 25 मिनिटे

मुलाखत भाग १.

अतुल पेठे : श्रोतेहो नमस्कार. महाराष्ट्रातील गावागावात आणि गावागावातील घराघरात ज्यांनी गेली सहा दशकं मराठी मनावर अधिराज्य गाजवलं ते जेष्ठ अभिनेते निळू फुले, म्हणजे अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके निळूभाऊ आज आपल्या भेटीला आलेले आहेत. सर्वप्रथम मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे त्यांचे स्वागत करतो आणि महाराष्ट्रातील तमाम कलावंतांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.

निळूभाऊ नमस्कार.

निळूभाऊ : (त्यांच्या खास शैलीत) नमस्कार मंडळी.

अतुल पेठे : निळू फुले असे दोन शब्द जाहिरातीत पाहिले की प्रेक्षकांना लाजवाब ,थरारुन टाकणारा आणि सहजसुंदर अभिनय पहायला मिळणार याची खात्रीच असते. निळूभाऊंनी रंगमंचावर आणि पडद्यावर उभी केलेली पात्रे ही मग रसिकांच्या मनावर विराजमान होतात. हे असे गेली अनेक वर्षे घडत आलेले आहे . प्रसिद्ध लेखक आणि निळूभाऊंचे मित्र वसंत सबनीस यांनी अभिनयाची विविधरंगी फुले फुलवणारा माळी म्हणजे निळु फुले अशी व्याख्याच केलेली आहे. समर्थ अभिनेता याव्यतिरिक्तही निळूभाऊंची उभ्या महाराष्ट्राला वेगवेगळी ओळख आहे. डॉक्टर राम मनोहर लोहियांच्या व्यक्तित्वाने आणि समाजवादी विचारसरणीने काम करणारा राष्ट्र सेवा दलाचा सच्चा, कृतीशील कार्यकर्ता. लोकशाही ,समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ही मूल्य जोपासणारा संवेदनशील नागरिक. चांगल्या साहित्याचा वाचक आणि नाटक, सिनेमा, सामाजिक कामांकरिता महाराष्ट्रभर अथक प्रवास करणारा सेवाभावी वृत्तीचा विनम्र माणूस म्हणून त्यांची ओळख आहे . तेव्हा श्रोतेहो, ही गप्पांची मैफिल दोन भागात असणार आहे . आजच्या पहिल्या भागात आपण निळूभाऊंचा जीवनप्रवास ऐकू. त्यात आपल्याला त्यांच्या या सर्व वैशिष्ठ्यांची मुळे सापडतील. तर दुसर्‍या भागात त्यांचा कलेबाबतचा दृष्टीकोन जाणून घेताना ‘निळूभाऊ’ या समग्र वृक्षाचा आपण अंदाज घेऊ शकू.

निळूभाऊ, अगदी बालपणापासून आपण सुरवात करू.

निळूभाऊ : हो हो.

अतुल पेठे : तुमचा जन्म कुठला ? कुठल्या गावचे तुम्ही?

निळूभाऊ : जन्म माझा खरं त्या स्वारगेट विभागामध्ये खडकमाळआळी मध्येच झाला. तिथे पंचहौद मिशनचं हॉस्पिटल आहे. आम्ही सगळी भावंडे – आम्ही भावंड म्हणायचे म्हणजे अख्खी क्रिकेटची टीम. 11 बंधु-भगिनी असे सगळे आम्ही त्या पंचहौद मिशनमध्येच जन्माला आलो. बालपण सगळं खडकमाळेतच गेलं. शेती वगैरे आजीची असल्यामुळं सगळे सण, शेतीला अनुषंगुण जे होते, ते सगळे सण घरामध्ये पाळले जायचे. विशेषत: बैलपोळा हा आमचा मोठा सण मानला जात असे. कारण त्यावेळेस शेतावरचे मजूर, सगळी जनावरे ही वाड्यामध्ये यायची, त्यांची पुजा व्हायची, त्यांना खाऊ पिऊ घालायचं. अशा शेतीच्या संदर्भामध्ये सगळे सण नेहमी पाळले जायचे.

अतुल पेठे : म्हणजे तुमचे वडील शेती करायचे.

निळूभाऊ : नाही. वडील नव्हते शेती करत. माझी आजी – म्हणजे आईची आई, ही शेती करायची. तिची शेती होती.

अतुल पेठे : पण म्हणजे घरामध्ये सगळं वातावरण शेतीशी निगडीत होतं.

निळूभाऊ : हो हो. वडील आमचे इतर उद्योग करत होते पण आयुष्यामध्ये एकही उद्योग त्यांना नीट जमला नाही. (मिश्किल हसत) सगळ्या उद्योगांमध्ये भयानक तोटे. त्यामुळे दर दोन वर्षानी उद्योग त्यांचा बदललेला असायचा. आज सायकलचं दुकान आहे. उद्या ट्रक आहे. परवा हॉटेल आहे. काही न काही उद्योग चालू असायचे. वडिलांना कधीही उद्योगमध्ये काही जमलं नाही. कारण मला असं वाटतं की व्यापारचं, उद्योगाचं मूलभूत काहीतरी ज्ञान लागतं. ते ज्ञानच त्यांना नव्हतं. त्यामुळे आजीवरच खूप अवलंबून असायचं.

अतुल पेठे : या सगळ्या वातावरणाचा पुढे तुमच्यावर काय परिणाम झाला असं वाटतं ?

निळूभाऊ : मला शेतीची गोडी लागली. आता ती फारशी दिसत नाही, पण अंमल ब्रिटिश असल्यामुळे – त्यांना गुसबेरी खूप आवडायची. आमची जवळजवळ पाच सहा एकर शेती होती. त्यातील 3 एकर शेती आम्ही गुसबेरीच लावायचो. त्या गुसबेरीला कॅन्टोन्मेंटच्या बाजारामध्ये प्रचंड मागणी असायची. दुधाच्या सायीबरोबर ती गुसबेरी साखर टाकून खाल्ली की म्हणजे ब्रिटिश माणूस म्हणजे भयंकर खुश असायचा. तेव्हा गुसबेरीचे छोटे छोटे – ज्याला आपण बॉक्सेस म्हणतो ते आम्ही नेले की पाच मिनिटांच्या आत ते खपायचे. आणि त्याची किंमत अफलातून यायची. कारण ब्रिटिश माणसांचे पगार हिंदी माणसापेक्षा भरपूर असल्यामुळे पैशांच्या बाबतीमध्ये त्यांनी कधी फारसं हेसीटेशन नाही दाखवलं. पैसा जो मागाल तो द्यायचे. त्यामुळे मी – पासली नावाची एक भाजी आहे. पासली आणि गुसबेरी हे घेऊन बाजारात जायचो म्हणजे येताना माझ्या खिशात २-३ रुपये असायचे. त्या काळातले २-३ रुपये. १९३५-४० चा काळ हा. तर समृद्ध काळ होता तो.

अतुल पेठे : तुमच्या जन्माची तारीख काय ?

निळूभाऊ – जन्माची तारीख लिहिलेलीच नाही. कारण ती पद्धतच नव्हती खरं म्हणजे. घरामध्ये ११ पोरं. आता एकच झालं की माझा मित्र तात्या बोराटे हा १९३० साली जन्माला आला, तेव्हा आई एवढं म्हणत होती की तो तुझ्यापेक्षा १ वर्षाने मोठा आहे. (हसत) मग माझी १९३१.

अतुल पेठे : लहानपणच्या या सगळ्याचे असे छोटे काही परिणाम आहेत का ? म्हणजे आनंदाचे क्षण किंवा त्यावेळचं पुणे, त्यावेळचा समाज किंवा एकंदर ब्रिटिश असणारं पुणे.

निळूभाऊ : मला स्वत:ला असं कधी गरिबी जाणवली नाही. त्या काळामध्ये हा. त्यानंतर खूप सोसावं लागलं. परंतु त्या काळामध्ये एकतर फार गरजाही नव्हत्या. कपड्याबद्दलची काही विशेष मागणी नव्हती. दोन वेळचे घरामध्ये भरपूर जेवण – चांगलं जेवण मिळाल्यानंतर – बाहेर हॉटेलमध्ये जाणं हे निषिद्धच मानलं जायचं. म्हणजे आम्ही चोरून लपून एखादा बटाटेवडा खायला जेव्हा हॉटेल मध्ये जायचो तेव्हा चारी बाजूला बघायचो की कोणी नातेवाईक तर नाही, आपल्या वाड्यातला माणूस तर नाही. हॉटेलमध्ये जाऊन एकदा चक्कर मारून यायचो की कोणी मंडळी आपल्या ओळखीची तर नाही. म्हणजे हॉटेलमध्ये जाणं वगैरे निषिद्ध मानलं जायचं. त्यामुळे सुखाचे दिवस होते खरं.

अतुल पेठे : पण तुम्ही शाळेत कुठल्या होता ?

निळूभाऊ : शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये.

अतुल पेठे : शाळेतील वातावरण काय होतं त्यावेळेस ?

निळूभाऊ : उत्तम वातावरण होते. बाबुराव जगतापांची शाळा. मला मराठीला शांता शेळके माझ्या शिक्षिका होत्या. त्यामुळे कोणी मास्तर गैरहजर झाला की सगळ्या विद्यार्थ्यांचा आग्रह असायचा की शेळकेबाईंना बोलवा. मग शेळके बाई चेकॉवच्या, फ्रेंच काही गोष्टी, काही चांगले सिनेमे ,काही मराठीतल्या कथा ,कविता असं अख्खा तास साहित्य, चित्रपट, नाटक याच्यावर जायचा आणि काही केल्या तो तास संपू नये असं वाटायचं.

अतुल पेठे : वाह !

निळूभाऊ : शांताबाईचा असल्यामुळे. शांताबाईचं वाचन अफाट. शांताबाईना काय कोणास ठाऊक ; पण त्या विद्यार्थ्यांच्यामध्ये खूप रमून जायच्या.

अतुल पेठे : पण शाळेत तुम्ही कधी नाटकात वगैरे काम केली होतीत ?

निळूभाऊ : नाही नाही. कधीच नाही .

अतुल पेठे : म्हणजे नाटकाशी संबंध नव्हता. वाचनाचं वेड लागलेलं होतं.

निळूभाऊ : वाचनाचं वेड होतं.

अतुल पेठे : काय वाचन करायचात त्यावेळेस तुम्ही ?

निळूभाऊ : त्यावेळेसचं वाचन म्हणजे कथा कादंबर्‍या वाचायचो. अत्रे-फडके वाद चालू होते. खांडेकर-फडके वाद चालू होते. ‘जीवनासाठी कला की कलेसाठी कला’ वगैरे असले वाद चालू होते त्यावेळेला. त्यात रस घ्यायचो. नंतर त्यातला फोलपणा कळला की हे काही खरं नव्हतं.

अतुल पेठे : पण स्वातंत्र्याची सगळी रणधुमाळी तुम्ही अनुभवली.

निळूभाऊ : हो. घरामध्ये माझे मामा, भाऊ वगैरे सगळी मंडळी ही स्वातंत्र्यालाढ्यत भाग घेत होती. त्यातली जवळजवळ सगळे जेल मध्ये होते . १२-१२ महिने,१५ महिने अश्या शिक्षा झाल्या होत्या. मला आठवतं ते की काका गाङगीळ आमचे वकील होते. तर माझ्या भावाची वकिली काकाकडेच. तर त्यावेळेला काकाची भेट व्हायची. अतिशय गोरेपान अशे गृहस्थ. येरवडा जेलच्या बाहेर आम्ही घराची मंडळी भेटायला गेलेली असायची आणि काका समजून सांगायचे ,”काही चिंता करू नका. खायला व्यवस्थित मिळतंय. पोराला मारहाण होत नाहीये. तुम्ही फार त्रास घेऊ नका आणि फार इथे येण्याचीही गरज नाही. बहुतेक दोन तीन महिन्यात सुटतील.” असे ते आश्वासन द्यायचे. आणि खूप प्रेमाने ते या सगळ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांशी बोलायचे.

अतुल पेठे : म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये एक राजकीय विचारसरणीला प्रेरीत असं वातावरण होतं.

निळूभाऊ : हो. तो काळच असा होता. ४२ चा तो चले जाव ठराव झाला मुंबईतला आणि एकदम वातावरण बदललं होतं. रोज निदर्शनं चालायची. त्यानंतर मोर्चे निघायचे. गोळीबार व्हायचे. मला आठवते की एस.पी.कॉलेजच्या समोर गोपाळ अवस्थी नावाचा आमचा मित्र होता. त्याच्या पायामध्ये गोळी गेली होती. गोळीबार झाला आणि कॉलेज बंद करा म्हणून निदर्शनं करायला जे विद्यार्थी गेले होते त्यात आम्ही सगळेच होतो. मी तर लहान होतो. पण गोपाळ खूप माझ्यापेक्षा 5-10 वर्षाने मोठा होता. आणि चक्क गोळ्या झाडल्याली पोरं आत शिरत होती एस.पी.कॉलेजमध्ये. गोपाळला उजव्या पायाला गोळी लागली आणि तो पडला. त्याला उचलून धारिया आणि या सगळ्या मंडळींनी हॉस्पिटलमध्ये आणलं. अनंतराव पाटील, धारिया हे त्यावेळेला आमचे तरुणांचे पुढारी. आम्ही त्यावेळेला लहान होतो. मी म्हणजे – माझं वय त्यावेळेला १२-१३ वर्षांचं.

अतुल पेठे : त्यावेळेला कोणता मोठा राजकीय पुढारी तुम्ही बघितला ? गांधीजीना वगैरे तुम्ही बघितलेलं आहे ?

निळूभाऊ : हो हो. गांधी जेव्हा इथे नेचर क्युयरला जेव्हा उपचारासाठी आले तेव्हा जवळजवळ मी सगळे पुढारी पाहिले. मौलाना आझाद पाहिले. जे.बी कृपलानी आणि सुचेता कृपालानी यांना पाहिले. आणि भूमिगत असताना भल्या पहाटे अरुणाताई असफअली – त्या एकदा येऊन गेलेल्या आम्हाला कळलं . मी आणि तात्या बोराटे, आम्ही पहाटे ३.३० वाजता घरातून निघायचो खडकमाळेतुन पायी. नेचर क्युयरेस्ट हे पुणे स्टेशनच्या पाठीमागे दिनशा मेहतांचे नेचर क्युयर आहे . तिथे स्वयंसेवक म्हणून जायचो. बरोबर ५ ला तिथे गांधीजी बाहेर पडायचे . त्यामुळे त्यांच्याबरोबर सर्वसाधारणपणे अर्धा तास त्यांचं फिरणं, त्यांच्याबरोबर गप्पा अशा सगळ्या चालू असायच्या. आम्हा दोघांच्या खांद्यावर हात टाकायचे आणि अतिशय झपा झपा झपा झपा गांधीजी चालायचे. आम्हाला म्हणजे पळावंच लागायचं. तर त्या काळामध्ये ही सगळी पुढारी मंडळी गांधींशी भेटायला यायची. बोलणी करायला यायची. बैठका व्हायच्या. हे सगळे पुढारी मी जवळजवळ पाहिले .

अतुल पेठे ; म्हणजे तुम्ही जवळजवळ महाराष्ट्रातील अनेक स्थित्यंतरंच बघितलेली आहेत.

निळूभाऊ : हो हो .

अतुल पेठे : या सगळ्यामध्ये तुमचं शालेय शिक्षण संपलं आणि तुम्ही तरुण जेव्हा झालात तेव्हा कॉलेज वगैरे ?

निळूभाऊ : नाही नाही. खरं म्हणजे शिक्षणाची बिलकूल आवड नाही. एक मराठी विषय सोडला तर मला शाळेमध्ये काही रसच नव्हता. तेव्हा ४२ चे निमित्त झाले आणि आमच्याकडे काम काय होते तर बुलेटीन पोहचवणे, निरोप देणे इकडेतिकडे वगैरे. या सगळ्यामध्ये शाळा माझी सुटली ती पुन्हा कधी शाळेत गेलोच नाही. आणि ते एक निमित्त होतं. खरं म्हणजे मला बिलकुल शाळेची आवड नव्हती .

अतुल पेठे : पण तुम्ही त्यावेळेस जे काम करायच्या ते सर्व कॉग्रेस पक्षाचं करायचात ?

निळूभाऊ : हा. म्हणजे तेव्हा सगळे पक्ष कॉग्रेस पक्षातच काम करत होते.

अतुल पेठे : आणि राष्ट्रसेवा दलाकडे पुढे तुम्ही ओढला गेलात.

निळूभाऊ : हो.

अतुल पेठे : त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल .

निळूभाऊ : सेवा दलाच्या शाखा होत्या. कारण जातीवादी शक्ती वाढत होत्या. आणि त्यांच्या विरोधामध्ये काही करून राष्ट्रीय प्रवृत्ती वाढल्या पाहिजेत आणि विशेषत: हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन यांच्यामध्ये भेदभाव होता कामा नये, कारण तसा तो झाला तर ब्रिटीशांना फावलं जातं. आपल्या मधल्या भांडंणामुळं स्वातंत्र्य लांबतं आहे असा एक त्यावेळचा ग्रह होता. म्हणून सर्व जातीजमातीच्या, धर्माच्या लोकांना एकत्र करणं आणि त्यांचा एक पक्ष बनवणं,स्वातंत्र्याच्या चळवळीकरिता ही शक्ती उभी करणं असं ते होतं. तिथून अप्पा मायदेव आणि लालजी कुलकर्णी – मूळ कल्पना श्री. गो. लिमये आणि एस एम यांची. त्यांनी ठरवलं की पुण्यामधून सुरवात करायची. आणि ज्या ज्या ठिकाणी जातीवादी शक्ती आहेत, त्यांच्या शाखा आहेत त्याच्यासमोर सेवादलाची शाखा उभी करायची. भाऊ जेल मध्ये होता माझा. त्याने मला हे पाठवलं. खरं म्हणजे मी संघात जात होतो. आणि भावाने सरळ सांगितलं की जायचं नाही.तिकडं जायचं नाही. हे सेवादल बघ. तर मी सेवादलात जायला लागलो. संघामध्ये एकच गोष्ट घडली अशी की मी माझ्याबरोबर ख्रिश्चन आणि मुस्लिम मित्र होते. दोन तीन दिवस आम्ही एकत्र राहिलो शाखेत. हळूहळू त्यांना सांगितलं की तुम्ही येऊ नका. मलाही सांगितलं की त्यांच्याशिवाय तुम्ही येत चला. त्यांच्याशिवाय खेळायला काय ? हा मला प्रश्न पडला. राजकीय विचार काहीच नाही. आणि तिथून बाहेर पडलो आम्ही आणि भावाचं पत्र आलं होतं की तू याच्यात जा. अप्पा तिथे आहे. खड्डा पठार नावाचं मैदान होतं .त्याठिकाणी सेवा दलाची शाखा होते. तेव्हा तुम्ही लोक तिकडं शाखेत जा. अप्पा मायदेव म्हणजे कवि मायदेवांचे चिरंजीव आणि लालजी कुलकर्णी हे तिथे असत. श्री.गो. आमचे नेते होते. सेवा दलाचे तेव्हाचे काम श्री गों.च्याच खांद्यावर होते. एस.एम. दलप्रमुख होते. तर आम्ही त्याना विचारलं की आम्ही सगळे असे ख्रिश्चन, मुस्लिम, दलित अशी सगळी मंडळी सेवादलाला आलो तर सर्वांना येतं येईल ना ? ते म्हणाले बिलकुल. कुठल्याही जाती धर्माच्या माणसाला सेवादलामध्ये प्रवेश आहे. मी नेहमी म्हणतो की धर्मनिरपेक्षतेचा पहिला धडा इथे सेवादलात मी शिकलो.

अतुल पेठे : महात्मा जोतिबा फुले आणि तुमचं काय नातं आहे ?

निळूभाऊ : खरतर त्यांची जी चुलत मंडळी आहेत त्यापैकी आम्ही आहोत.

अतुल पेठे : पण वैचारिक वारसा तर उघडच आहे .

निळूभाऊ : नाही नाही. खरं तर आमच्या सगळ्या फुल्यांनी जोतिबा फुल्याना भयंकर त्रास दिलेला आहे. अतिशय जोतिबाशी वाईट वागलेली मंडळी कोणी असेल तर माझे पूर्वज असतील. आजोबा वगैरे आमचे. या लोकांनी जोतिबाना फार त्रास दिलाय. घरामध्ये बिलकुल पाठिंबा जोतिबाना नव्हता. मी सेवादलात आलो आणि हा विचार घेतला .

अतुल पेठे : पण तुम्ही हे सगळं करत असताना चरितार्थासाठी म्हणा – पण माळीकामाकडे वळलात. तिकडे कसं गेलात ?

निळूभाऊ : नाही. माळीकाम तर असं की एक डिप्लोमा होतं माळीकामाचा. त्याचा वर्ग चालायचा एक इथे गणेशखिंडला. त्याठिकाणी दोन वर्षांचा तो कोर्स होता. तर आपल्या शेतीला आधुनिक – कसल्या पद्धतीने शेती करता येईल? किंवा शेतीचं उत्पन्न कसं वाढेल? एकरी उत्पन्न कसं वाढेल ? शेतीमध्ये कुठल्या मालाला परप्रांतामध्ये, मुंबईमध्ये, इकडेतिकडे, बाजारपेठेत मागणी आहे ? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास खरं म्हणजे त्या माळीकामाच्या वर्गात होत होता. म्हणून मी तिकडे गेलो. आणि दोन वर्षात मी तो डिप्लोमा करून दोन वर्षांचा तो कोर्स झाला आणि मला एकदम आर्म फोर्स मेडिकल कॉलेजची (AFMC) ची नोकरी आली. कर्नल वाबळे माझे गार्डन ऑफिसर होते. हे बालगंधर्वांचे जावई. त्यांना माहीत होतं की सेवादलाशी माझे संबंध आहेत वगैरे. थोडा संबंध त्यांचाही या लोकांशी होता. मला म्हणाले ‘तू इथे कसा?’ मी म्हंटलं, नोकरीसाठी आलो. घराची परिस्थिती आता तशी काही फारशी बरी नाही. ते म्हणाले .ठीक आहे. तू हेड माळी. त्यांनी मला हेड माळी करून टाकलं. त्यामुळे सेवादलाचं कलापथक, सेवादलाची इतर कामं याकरिता मला भरपूर वेळ मिळायला लागला. मी कधीही गार्डन ऑफिसर म्हणून वाबळे यांच्याकडे गेलो – कर्नल होते ते – म्हंटलं कर्नल साहेब मला असं असं जायचं आहे तर ते जा म्हणायचे. कलापथकाचे 15-15 दिवसांचे दौरे मी त्या काळात केले.

अतुल पेठे : पण याच वेळेला तुम्हाला नाटकाची आवड लागली का ? पहिला चेहर्‍याला रंग तुम्ही कधी लावलात ?

निळूभाऊ : मी नकला चांगल्या करायचो.

अतुल पेठे : म्हणजे कोणाच्या ?

निळू भाऊ : अगदी साने गुरुजींपासून सगळ्यांच्या नकला करायचो. अशोक मेहतांची करायचो. पुढार्‍यांच्याच करायचो. कारण ती जवळ होती मंडळी. त्या नकला करत असताना मग मला गो.पु. चे चुलते डॉक्टर देशपांडे आणि आवाबेन देशपांडे भेटले. आवाबेन देशपांडे या शांतीनिकेतन मधून शिकून आल्या. विशेषतः नृत्याचं शिक्षण त्यांनी तिकडे घेतलं. सेवा दलाच्या कलापथकामध्ये पुणे शहराचा नृत्याचा विभाग त्या चालवत असत. माझ्याबरोबर इतरही मंडळी काम करत असत ; पण ती सगळी नारायण सदाशिव पेठेतील असल्यामुळे आणि लोकनाट्यामध्ये सगळी भाषा ग्रामीण असल्यामुळे ती मंडळी चुकीचं ग्रामीण बोलत. तर तात्या माडगुळकर मला म्हणाला की हे काही खरं नाही यार – तुम्हीच करा. (हसत )मग मी ‘कुणाचा कुणाचा मेळ नाही’ मधला नाम्या, ‘पुढारी पाहिजे’ मधला रोंग्या, ‘बिन बियाचे झाड’ मधला न्हावी हे सगळं. माझं ग्रामीण चांगलं होतं म्हणजे काय तर मी तीच भाषा बोलत होतो. त्याच परिसरात राहत होतो.

अतुल पेठे : प्राध्यापक दत्ता भगतांनी तुमच्याविषयी एक फार चांगलं असं म्हंटलय की निळू फुल्यांचं योगदान काय ? तर खरी ग्रामीण भाषा निळूभाऊंनी रंगमंचावर आणि चित्रपटात आणली. अन्यथा लोक नक्कल करायचे. म्हणजे कोल्हापूरला किंवा गावात तसं बोलत नाहीत. पण निळूभाऊनी ती अस्सल ग्रामीण भाषा सर्वांसमोर आणली. मघाशी बोलण्यामध्ये उल्लेख आला माडगूळकरांचा. तुमचं आणि माडगूळकरांचं खूप नातं होतं.

निळूभाऊ : हो. तात्या. काय झालं ; दूरदर्शनवर आणि आकाशवाणीवर काम करायचे तात्या. आणि मग दरवर्षी त्यांना होळीच्या दिवशी लोकनाट्य लागायचं. तर ते आम्हाला सुचवायचे. काहीतरी करा बाबा यावेळेला. मग ‘शिमगा होळी’ नावाचं एक लोकनाट्य आम्ही पहिल्यांदा केलं. ‘बिन बियाचं झाड’ केलं. ‘कुणाचा कुणाला मेळ नाही’ केलं. अशी लोकनाट्य इथेच केली.

अतुल पेठे : पण एकंदर त्यावेळचे वातावरण कसे होते ? त्या नाटकमधील वातावरण, विषय काय असायचे ?

निळूभाऊ : तात्या दिग्दर्शक. तात्या वाचून दाखवायचे आणि आम्ही त्याची नक्कल करायचो.

अतुल पेठे : आणि तुमच्याबरोबर काम करायला कोण कोण होते ?

निळूभाऊ : त्यावेळेला माझ्या बरोबर बापू देशमुख होते. नारायण आवटे होता. बाळ रणपिसे होते. तात्या बोराटे होता. राम नगरकर होता. लीला चांदोरकर म्हणून आमच्यात एक उत्तम गायिका होती. ज्योतीने कधीकधी – म्हणजे ज्योती सुभाषने काम केलय. धुळ्याची शामला म्हणजे डॉक्टर लोहियांची बायको ही आमच्याबरोबर काम करायची. आणि सुधा वर्दे, प्रमिला दंडवते. अगदी गवळनीमध्ये कमल पाध्येनीही काम केलय. जयवंत दळवी, पी.एल.देशपांडे, वसंत बापट ही सगळी मंडळी कलापथकामधून येऊन गेली आहेत.

अतुल पेठे : त्या कलापथकाचा काय नेमका परिणाम झाला आणि ? तुम्ही लोकांपर्यंत जेव्हा विषय जायचात तेव्हा त्याची उदिष्ट काय असायची ?

निळूभाऊ : उदिष्ट सरळ असं होत की लोकांचं मनोरंजन करता करता लोकांचं प्रबोधन करणं.

अतुल पेठे : आणि विषय काय असायचे ?

निळूभाऊ : गावाचा विकास. कारण नुकतच स्वातंत्र्य मिळालं होतं. त्यामुळे त्यावेळेला त्याच्या पुढे गावाचा विकास कसा करावा ? या देशाचा विकास म्हणजे तरी नेमकं काय तर गावाचा विकास. आणि ही खेड्यात राहणारी आमची जनता आहे यांना शिक्षण, शेतीमधली सुधारणा, पाण्याच्या संदर्भामधील माहिती, या सगळ्या गोष्टी शिकवल्याशिवाय त्यांना कळणार नाही. कारण शिक्षणच नव्हतं. कसलाच विकास नव्हता. एकदा पेरलं, ते कसबसं उगवलं वेळेवर- पाऊस पडला तर ठीके नाहीतर दुष्काळीच. महाराष्ट्रमध्ये तरी – जवळजवळ अर्धा महाराष्ट्र असा होता की पावसावर अवलंबून होता. आणि तो पावसावर अवलंबून असल्यामुळे वेळीच पाऊस पडला तर ठिके. कधी तो वेळीच पडायचा. कधी तो जास्त पडायचा. कधी बिलकुलच पडायचा नाही. अशा अवस्थेमध्ये काय करावं नेमकं? कुठल्या पिकांना शेतीमध्ये अग्रक्रम द्यावा ? या सगळ्या गोष्टींचं सेवापथक म्हणून काय आणि कलापथक म्हणून काय- अशी दोन्ही कामं होती. आणि त्यावेळच्या सेवा दलाच्या मुलांना देशाकरिता एक तास – म्हणजे सबंध आपल्या दिवसामधील एक तास हा बांधबंदिस्ती, त्यानंतर बुजलेली तळी, बुजलेल्या विहिरी किंवा गावात जायचे रस्ते सगळ्या गोष्टींकरिता द्यायचा असायचा.

अतुल पेठे : म्हणजे एका बाजूला नाटक करता करता तुम्ही प्रबोधन, मनोरंजन आणि प्रत्यक्ष गावात विकास कसा होईल याच एक जवळजवळ उत्तम प्रात्यक्षिक द्यायचात.

निळूभाऊ : ‘पुढारी पाहिजे.’ हे लोकनाट्य त्याच्यावरच आहे खरतर. त्याच्यावरच आधारलेलं आहे .

अतुल पेठे : पण हे सगळं करता करता अचानक तुम्ही सिनेमाकडे गेलात. ते कसे गेलात ?

निळूभाऊ : नाही. खरं म्हणजे मी सिनेमा करणार नव्हतो. मी फूलटाइम सेवादलाचच काम करायचं ठरवलं होतं. ही मंडळी आणि समाजवादयांच्यामध्ये फुट पडली. मला त्यावेळेला २५ रुपये मानधन होतं. सेवा दलाचा मी फूलटायमर होतो .ते माझ फूलटाइम पद गेलं. आता काहीतरी केलं पाहिजेल. त्यावेळेला बबन काळे वगैरे ही सगळी मंडळी आमच्याकडे अधूनमधून कलापथकाच्या निमित्ताने यायची. ते म्हणाले एक निर्माता आहे. त्याचे जरा बरे वाईट धंदे आहेत पण आपल्याला काय करायचे. तो आपल्याला लोकनाट्याकरिता पैसे देतोय. तर ते घेऊया आणि आपण एक लोकनाट्य काढूया. तर ते लोकनाट्य काढलं आणि मला पहिल्यांदा २५ रुपये प्रयोगामागे मिळायला लागले. महिन्याला २५ रुपये मानधन सेवादलात होतं आणि इथे प्रयोगामागे २५ रुपये. असा मी श्रीमंत झालो एकदम .

निळूभाऊ : म्हणजे तुम्हाला अभिनेता म्हणून असं वाटलं की ..आता आपण अभिनेता झालो.

निळूभाऊ : हो. दिग्दर्शनही मीच केल होतं त्या लोकनाट्याचं. शंकर पाटलांचं होतं ‘दोन बायकांचा दादला’ म्हणून.

अतुल पेठे : आणि पहिला चित्रपट कुठला तुमचा?

निळूभाऊ : एक गाव बारा भानगडी.

अतुल पेठे : म्हणजे झेलेअण्णा.

निळूभाऊ : बरोबर.

अतुल पेठे ; म्हणजे थोडक्यात एक अभिनेता व्हायचं असं ठरवून केलेला हा प्रवास होता?

निळूभाऊ : नाही नाही. मुळीच नाही .

अतुल पेठे : जसा वाटेत प्रवास होत जातो तसा झाला .

निळूभाऊ : अगदी. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ मधलं काम पाहिलं आणि ही मंडळीं म्हणाली एक गाव बारा भानगडी नावाचा चित्रपट आहे त्यात काम कराल का ? विनोदी व्हिलन आहे. कारण कर्नाटकी वळनाची ती मराठी भाषा होती. तर १५-२० दिवस मी शंकर पाटलांच्याकडे ती भाषा शिकायला जायचो. आणि माझ्यापेक्षा शंकर पाटील ती फार उत्तम बोलायचे .

अतुल पेठे : म्हणजे घरातील वातावरण, पुण्यातलं वातावरण, अनेक ऐकलेल्या चर्चा, व्याख्यानं, शांताबाई शेळक्यांचं मार्गदर्शन आणि त्या शाळेत शिक्षिका असणं, सेवादलातलं वातावरण, पुढे सेवा दलाच्या निमित्ताने केलेली नाटके आणि अचानक तिथनं काम करता करता स्टेज वर तुम्ही आलात आणि अभिनेता म्हणूनच पुढे प्रसिद्ध पावलात. त्याची बीजे एका अर्थाने तुम्ही सांगितलेल्या प्रवासात कदाचित दिसू शकतात .

निळूभाऊ : अगदी. होय.

(भाग पहिला समाप्त.)

शब्दांकन : कृतार्थ शेवगावकर

छायाचित्र : कुमार गोखले ( प्रेमाची गोष्ट? या नाटकाच्या तालिमीदरम्यान निळूभाऊ फुले,डॉ.श्रीराम लागू आणि अतुल पेठे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *