नाटकाचे नाव,संस्था,स्थळ,वेळ,लेखक,दिग्दर्शक,कलाकार आणि तंत्रज्ञ यांची माहिती सांगणे हा कुठल्याही नाटकाच्या पोस्टरचा प्राथमिक हेतू असतो. कदाचित पूर्वीच्या काळी एवढी माहिती प्रेक्षकांना नाट्यगृहापर्यंत आणण्यासाठी पुरेशी असावी.
बदलत्या काळात प्रेक्षकांना नाट्यगृहाकडे ओढून आणण्यासाठी आकर्षित करणे ही जवाबदारीही पोस्टर वर येऊन पडली असावी.आणि मग नवीन नाटक करायचे म्हणजे संगीत,नेपथ्य,रंगभूषा या विभागासोबत पोस्टर डिझाईन हा विभागही नाट्यव्यवहाराचा अविभाज्य भाग झाला असावा. नाटकाच्या आशय,विषय,धाटणीला अनुसरून काम करणाऱ्या एका खास पोस्टर डिझायनर ची नेमणूक होऊ लागली.या विषयातले तज्ञ याविषयी अधिक माहिती सांगू शकतील. नाटकाच्या पोस्टर्सचा इतिहास हाही कदाचित बदलत्या नाटकाची साक्ष देणारा असावा.
असे नाटकाच्या आशयानुरूप डिझाईन केलेले खूप वेगवेगळे चांगले पोस्टर्स आज पाहायला मिळतात.कॉम्प्युटरवर तयार न मिळणारे आणि नाटकाच्या आशयाला न्याय देणारे वेगवेगळे फॉन्ट पाहण्या-वाचण्याची संधीही अक्षरसुलेखनकार आपल्याला देतात.कुमार गोखले सर हे असेच मला माहीत असलेले एक अक्षरसुलेखनकार आणि पोस्टर डिझायनर.
कधी कधी उलट घडते.आकर्षक पोस्टर तयार करण्याचा धडपडीत आणि चुकीच्या रंगसंगतींमुळे नाटकाची वेळ,स्थळ,तंत्रज्ञ यांची नावे या गोष्टी पोस्टर मध्ये शोधून शोधून काढाव्या लागतात.कधी फॉन्ट खूप बारीक असल्याने पूर्ण माहिती वाचण्याची तसदीही घ्यावी वाटत नाही.तर कधी पोस्टर नक्की नाटकाचे की सिनेमाचे की अजून कशाचे हे सहजरित्या पोस्टर पाहताक्षणी कळत नाही.
त्यापेक्षा मग असे प्रयोगाची माहिती सुटसुटीतपणे आणि ठसठशीतपणे सांगणारे पारंपरिक ब्लॅक अँड व्हाईट पोस्टरच कधीकधी छान वाटते.